यावल प्रतिनिधी । तालुक्यातील पाडळसे येथील ३५ वर्षीय विवाहिता आपल्या दोन लहान मुलींसह गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी विजय चौधरी (वय-३५) रा. पाडळसे ता. यावल जि.जळगाव ह्या आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहेत. २० डिसेंबर २०२१ रोजी दुपारी माधुरी चौधरी ह्या घरात कुणालाही काहीही न सांगता सात वर्षाची आणि पाच वर्षाची अश्या दोन मुलींना घेवून बेपत्ता झाल्या आहेत. विवाहिता आणि बालिकांचा नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली कुठेही आढळून आल्या नाहीत. हाताश झालेले विवाहित महिलेचे सासरे मुरलीधर तोताराम चौधरी यांनी बुधवार ५ जानेवारी रोजी सकाळी फैजपूर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली आहे. विवाहिता आणि दोन बालिका कुणालाही आढळून आल्यास फैजपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांनी केले आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेश बऱ्हाटे हे करीत आहे.