मुंबई प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्या वाढीस लागल्याचे दिसून येत असतांना गत चोवीस तासात राज्यातील पेशंटची संख्या ११ हजारांच्या पार गेली आहे.
आज तब्बल ११ हजार ८७७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आज फक्त मुंबईतल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने ८ हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना जास्त धास्ती आहे. तर ९ कोरोना रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. २ हजार ६९ कोरोना रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. आज राज्यात ओमिक्रॉनचेही नवे ५० रुग्ण आढळून आल्याने चिंता आणखीच वाढली आहे. राज्यात रोज मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे चिंता वाढत आहे. कोरोनाने हैराण केले असतानाच ओमिक्रॉनचा संसर्ग देखील वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
दरम्यान, ओमायक्रॉनचे संकट लक्षात घेता राज्य सरकारने लसीकरणाला वेग देण्याचे ठरविले आहे. उद्यापासून १५ वर्षांवरील मुलांचे लसीकरण सुरू होत असून यासाठी राज्य सरकारने जय्यत तयारी केली आहे. शनिवारपासूनच लसीकरण नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात करण्यात आलीय. १५ ते १८ या वयोगटातील मुलांचे आधारकारर्ड तसेच आधारकार्ड नसेल तर शाळेतील ओळखपत्राच्या मदतीने मुलांचे लसीसाठी नाव नोंदवता येते.
राज्यात सध्या होणारी कोरोना रुग्णांची वाढ स्फोटक असल्याने राज्यातले आणि मुंबईतले निर्बंध आणखी कडक केले जाण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका ओळखून राज्य शासनाने काही निर्बंध लागू केले आहेत, मात्र तरीरी रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसून येत नाही, त्यामुळे हेच निर्बंध आणखी कडक होऊ शकतात. कालच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत संकेत दिले होते.