नितेश राणेंच्या वक्तव्यावरून विधानसभेत गदारोळ

 

मुंबई प्रतिनिधी | नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून आज विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. भास्कर जाधव यांच्यासह शिवसेनेच्या सदस्यांनी यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील राणेंची चूक झाल्याचे कबूल करतांनाच सत्ताधार्‍यांना खडे बोल सुनावले.

 

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशीच्या सुरुवातीलाही विरोधकांकडून पायर्‍यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. यावेळी आमदार नितेश राणेदेखील इतर भाजपा आमदारांसोबत आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात पोहोचले. यावेळी नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज देण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता सत्ताधारी महाविकास आघाडीने यावरुन नितेश राणे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

आज विधानसभेत यावरून गोंधळ झाला. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणेंच्या कृत्यावर आक्षेप घेत त्यांचं कायमचं निलंबन करावं अशी मागणी धरत जोरदार टीका केली. ते म्हणाले की, या सभागृहाची प्रथा, परंपरा आणि प्रतिष्ठा राखण्यासाठीचा विषय तिसर्‍यांदा चर्चेला आला आहे. या सभागृहामध्ये तीन दिवसांपूर्वी मी काही अंगविक्षेप केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सभागृहाने मला माफी मागायला, निलंबित करायला सांगितले. त्यानंतर मी माफीदेखील मागितली. पण राणे यांनी केलेला प्रकार गंभीर असून अशा सदस्याला कायमस्वरुपी निलंबित करा अशी माझी मागणी आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.

यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही लोकशाहीत लढणारे लोक आहोत, रडणारे नाही. नितेश राणे यांच्या संदर्भात आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही सदस्याने असं वागू नये सांगितलं आहे. पण आता भास्कर जाधव तुम्ही विषय काढला आहे म्हणून निदर्शनास आणू देतो की, याच सभागृहात भुजबळ साहेब तिकडे बसायचे आणि भास्कर जाधवांसहित आम्ही सगळे इकडे बसायचे तेव्हा हुप हुप करणार्‍यांमध्ये भास्कर जाधवही होते. हे या सभागृहाने पाहिलं आहे, अशी आठवण फडणवीसांनी यावेळी करुन दिली.

Protected Content