यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मारुळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अल्पसंख्याक दिन साजरा करण्यात आला.
दरम्यान, या कार्यक्रमाचे आयोजन कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे यावल तालुका अध्यक्ष इखलास सय्यद यांनी केले. मारूळ ग्रामपंचायतच्या सभागृहात आयोजीत या अल्पसंख्यांक दिवस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुळ गावाचे तरूण सरपंच असद अहमद जावेद अली सय्यद हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच पत्ती सलामत अली सय्यद, कॉंग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष मसरूर अली सय्यद ग्रामपंचायत सदस्य मुर्तजा अली सय्यद मुखतार उद्दिन फारुकी मती उर रहमान पिरजादे काँग्रेस युवा यावल तालुका अध्यक्ष मुदस्सर नजर सय्यद हे होते.
अल्पसंख्यांक समाजात जनजागृती व्हावी, या उद्देशाने १९९२ सालापासून अल्पसंख्यांक दिवस साजरा करण्यात येत आहे. जेणेकरून अल्पसंख्यांक समाज हा जागृत होऊन आपल्या न्याय हक्काच्या लढण्यासाठी एकत्र झाला पाहिजे. तेव्हाच सामाजिक हित साध्य करता येईल, अल्पसंख्यांक समाजाचे सामाजिक प्रबोधन व सामाजिक जागृती हा यामागील मुख्य उद्देश्य असल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य बाळू तायडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. अल्पसंख्यांक समाजा हा दुर्लक्षित समाज असून मनुवादी प्रवृत्तींच्या जातिवाद विचारांच्या लोकांमुळे अल्पसंख्यांक समाजाचा विकास खुंटला असून अशा सुरेख व जागृत कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजाचे एकत्रीकरण करणे सोपे होईल व अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळून आपल्या न्याय हक्कासाठी शांततेच्या अहिंसेच्या व लोकशाही मार्गाने समाजातील तरुणांनी व नेत्यांनी एकत्र येऊन लढणे ही काळाची गरज असल्याचे सरपंच असद सय्यद यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
यावेळी, काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे यावल तालुका अध्यक्ष इखलास सय्यद यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमास समाजसेवक हसरत अली सय्यद, युवराज इंगळे, मोहब्बत अली सय्यद, परवेज अखत्तर सय्यद,सलीम सय्यद, शफिक उद्दीन फारूकी,अखलाक फारूकी इत्यादींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोजगार सेवक व माजी ग्रामपंचायत सदस्य बाळू गोविंदा तायडे यांनी केले तर आभार काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे यावल तालुका अध्यक्ष इखलास सय्यद यांनी मानले.