एरंडोल प्रतिनिधी । दीपस्तंभ फाऊंडेशन, आर्यन फाऊंडेशन, योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, विवेकानंद केंद्र, आणि राठी हॉस्पिटल यांच्या विद्यमाने काबरे विद्यालयाच्या पटांगणावर तीन दिवसीय व्याख्यनमालेचे आयोजन केले असून आज व्याख्यानमालेचा दुसरा दिवस आहे.
आयुष्य जगताना आपण सर्व नवनवीन स्टाईल शोधत असतो आणि आपली जीवन शैली आधुनिक कशी होईल या शोधात असतो.पण आयुष्यात उंचावर जाण्यासाठी आदर्श विचारसरणी शोधता आली पाहिजे आणि शोधून ती अंगीकारता आली पाहिजे.विचारांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. जर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत जाते. वाईट, नकारात्मक विचार जीवनाला चुकीची कलाटणी देतात तर सकारात्मक विचार माणसाला जीवनात यशाच्या शिखरावर नेतात असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्त्या आणि निवेदिका अनघा मोडक यांनी केले.
दीपस्तंभ फाऊंडेशन, आर्यन फाऊंडेशन, योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, विवेकानंद केंद्र, आणि राठी हॉस्पिटल यांच्या विद्यमाने काबरे विद्यालयाच्या पटांगणावर सुरु असलेल्या तीन दिवसीय व्याख्यनमालेच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते.या वेळी आमदार चिमणराव पाटील, माजी मुख्याध्यापक डी एस पाटील, ग्रामीण शिक्षण मंडळ चेअरमन सचिन विसपुते, डॉ.रवी महाजन, डॉ.रेखा महाजन, गायक व समुपदेशक सृष्टी कुलकर्णी, दीपस्तंभ फाऊंडेशनची प्रतिनिधी मानसी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तिथ होते.या प्रसंगी “शिवभाजे जीव सेवा” हे व्रत मानून गो सेवा, गरीब व गरजू लोकांसाठी त्यांचा अंतिम प्रवास सुखकर व्हावा म्हणून अंतिम संस्कारासाठी स्वखर्चाने सर्पणाची व्यवस्था करणारे, लॉकडाऊनच्या काळात स्वखर्चाने अनेकांना अन्नदान करणारे महेश देवरे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
अनघा मोडक म्हणाल्या की, प्रत्येक दिवशी नवीन स्वप्न बघावं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने, जिद्दीने मेहनत आणि कष्ट करावे.प्रेरणा हि प्रत्येकाच्या आयुष्यात असायलाच हवी.रात्रीच्या गर्भात उद्याचा दिवस असतो. काही वेळा अपयश येईल का ? ह्या भीतीने आपण कोणतेही मोठे काम हाती घेत नाही.काही मोठी स्वप्न बघतच नाही, ती स्वप्न पूर्ण होतील ह्या दृष्टीने काही प्रयत्न करत नाही, परंतु असे करू नका.मोठी स्वप्ने पाहण्याचे धैर्य दाखवा, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.जर आपण मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले तर आपण नक्कीच एक आनंदी आणि परिपूर्ण आयुष्य जगू शकतो.जीवन जगत असताना आपल्याला सतत अनेकांची मदत मिळत असते. आपल्याला जन्म देणारे आईवडील, निसर्ग, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व गोष्टी पूरवणारी माणसं अशा अनेक गोष्टी आणि माणसे यातून आपलं जीवन समृद्ध होत असतं.यासाठीच जीवन जगत असताना प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी.तणावमुक्त जीवन जगायचं असल्यास माफ करायला शिका.
दीपस्तंभ व्याख्यानमाला हि आपल्या परिसराचे वैभव आहे.१४ वर्षापसून नियमित एक उपक्रम कुठलाही खंड न पडता चालू आहे हे नक्कीच कौतुकास्पद असेच आहे.नवीन पिढीमध्ये वैचारिक पेरणी करण्यासाठी अश्या उपक्रमांची आणि विचारांची आवर्जून गरज आहे.या व्याख्यानमालेचा मी नियमित श्रोता आहे.दीपस्तंभची हि वैचारिक चळवळ अशीच अखंड चालू राहो हीच सदिच्छा आणि शुभेच्छा अश्या भावना या वेळी एरंडोल मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे सूत्र संचालन अर्चना पाटील तर आभार यजुर्वेंद्र महाजन याने मानले.व्याख्यानाला परिसरातील पालक, विध्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते