जळगाव, प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केसीआयआयएल प्रस्तावित जागेवर नामफलकाचे अनावरण आज प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांच्या हस्ते झाले.
महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन तरुण उद्योजक घडावेत यासाठी केसीआयआयएलची स्थापना करण्यात आली असून या केंद्राला महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. गेल्या दिड वर्षापासून या नवसंशोधन व साहचर्य केंद्राच्या वतीने खान्देशात नवीन तरुण उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी ५० पेक्षा अधिक कार्यक्रम घेण्यात येऊन सखोल मार्गदर्शन करण्यात आले आहे. विद्यापीठात उभारण्यात येणाऱ्या या केंद्राच्या नियोजित जागी नामफलकाचे अनावरण सोहळा पार पडला. विद्यापीठ आणि केसीआयआयएल यांच्या अंतर्गत झालेल्या भाडेकरार दस्ताऐवजावर प्रभारी कुलसचिव प्रा.आर.एल. शिंदे आणि संचालक प्रा.भूषण चौधरी यांनी यावेळी स्वाक्षऱ्या केल्या. प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांनी विद्यापीठाकडून उद्यमशीलतेकरीता केल्या जाणाऱ्या प्रयत्नात केसीआयआयएलची भूमिका मोलाची ठरणार असल्याचे प्रतिपादन केले. या प्रस्तावित ५००० चौ.मी. जागेवर केंद्राची इमारत उभी केली जाणार असून विद्यापीठाने अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या जागेसाठी आर्कीटेक्टची देखील नेमणूक करण्यात आली आहे.
यावेळी प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार, उद्योजक छबीराज राणे, प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रा.ए.एम.महाजन, प्रा.धनंजय मोरे, प्रा.ए.बी.चौधरी, कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील, उपअभियंता आर.आय. पाटील, केसीआयआयएलचे संचालक प्रा.भूषण चौधरी, डॉ.विकास गिते, मुख्य कार्यकारी अधिकारी मनवीनसिंग चढ्ढा, उष्मायन व्यवस्थापक निखील कुलकर्णी, सुनिल नेमाडे, ए.एन.गोसावी, आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय नवोन्मेष संस्था, अहमदाबाद येथील सुभाष जगताप व सचिन जगताप यांचा प्रभारी कुलगुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केसीआयआयएल अंतर्गत स्टार्ट अप्सना काम करण्याची मोठी संधी प्राप्त होणार आहे.