आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही : मोदी

nandurbar modi

 

नंदुरबार (वृत्तसंस्था) जोपर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणताही ‘पंजा’ तुम्हाला हात लावू शकणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नंदुरबारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला टोला लगावला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतून दिलेल्या आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नंदुरबारला जाहीर सभेत दिले.

 

नंदुरबार लोकसभेच्या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ शहरातील धुळे रोडवरील स्वामी समर्थ केंद्राजवळील मोकळ्या मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती. प्रचारसभेला संबोधित करतांना मोदी म्हणाले की, नंदुरबारमधूनच त्यांनी आधार कार्ड योजनेची सुरूवात केली होती. मात्र, आता ही योजना जेव्हा मी राबवू पहातोय तेव्हा काँग्रेसचे लोक आधार कार्ड योजना बंद करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावत आहेत. आदिवासी बांधवांसाठी पेन्शन योजना सुरू करणार अशीही घोषणा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. मी सत्तेवर आहे तोपर्यंत आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे मोदी यावेळी म्हणाले. काँग्रेस आणि इतर पक्ष तुमची थट्टा करीत आहेत. मध्यप्रदेशात आदिवासी विकास योजनांसाठी पाठवलेला निधीही या पक्षांनी खाल्ला. कुपोषणाची समस्या आपल्याला समूळ नष्ट करायची आहे. मात्र, काँग्रेसवाल्यांची नियत साफ नाही म्हणूनच त्यांचं राज्य असलेल्या मध्य प्रदेशातही ते या पैशांमध्येही भ्रष्टाचार करीत आहेत, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. यावेळी सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी, डॉ. विजयकुमार गावित, आमदार उदेसिंग पाडवी, शिवसेनेचे संपर्कनेते बबनराव थोरात, अजय परदेशी, अनुप अग्रवाल, बबन चौधरी, सुभाष देवरे यांच्यासह धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content