जळगाव प्रतिनिधी । जळगावात राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. अजिंठा चौकात देखील याचे काम सुरू असल्याने रस्ता रूंद करण्यात आल्यामुळे वाहतूकीची कोंडी होत असल्यामुळे शुक्रवार १० डिसेंबर रोजी सकाळी उपमहापौर कुलभुषण पाटील, आयुक्त सतिष कुळकर्णी यांनी सर्कलची पाहणी केली.
याबाबत माहिती अशी की, गेल्या काही महिन्यांपासून शहरातील राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. चौपदरीकरणाचे काम तातडीने पुर्ण होण्याची मागणी वाहनधारकांसह नागरीकांकडून केली जात आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून अजिंठा चौकात वाहतूकीचा मोठ्या प्रमाणावर कोंडी होत आहे. यामुळे लहान मोठे अपघात होवून वाद निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे चौकातील असलेल्या एका इमारतीचा भाग हा अतिक्रमण मध्ये येत असल्याचे देखील समोर आले आहे. अजिंठा चौकात वाहतूक सुरळीत होण्यासाठी अनेक तक्रारी महापालिकेत प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शुक्रवार १० डिसेंबर रोजी उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिका आयुक्त सतिष कुळकर्णी, माजी महापौर नितीन लढ्ढा, माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी प्रत्यक्ष अजिंठा चौकात भेट देवून पाहणी केली. यावेळी नही विभागाचे निरीक्षक अधिकारी सी.एस. सिन्हा यांच्याशी चर्चा केली. तर अतिक्रमित इमारतीसंदर्भात देखील चर्चा करण्यात आली आहे. संबंधित अडचणी तातडीने सोडविण्याच्या सुचना उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिल्या आहेत.