जळगाव (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील मराठा-लासुर येथील ५५ वर्षीय शेतमजूर १४ एप्रिल रोजी अंगावर वीज पडल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याचा आज उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला सायंकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील मराठा-लासुर येथील बुधा काहरू भिल (वय ५५) हे १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास शेतातून गुरांसाठी चारा घेण्यासाठी गेले असता अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी बुधा भिल यांच्या अंगावर वीज पडल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने चोपडा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान प्रकृतीने कुठलाही प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांना बुधवारी १७ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता आज दुपारी ३.०० वाजता प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. मयत व्यक्ती हे हात मजुरीचा काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. याबाबत शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.