फैजपूर प्रतिनिधी | येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व ग्रामीण रुग्णालय, न्हावी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय एड्स दिवसाच्या औचित्याने आयोजित मार्गदर्शन, शपथ व पोस्टर प्रदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सद्यस्थितीत कोरोना विषाणू ने जगभर थैमान माजवलेले असताना जून 1981 पासून एड्स सारख्या महाभयंकर आजाराने अवघ्या विश्वाला ग्रासले आहे. एड्स हा आजार मानव जातीला लागलेला कलंक असून यातून तरुण पिढीने नैतिक जबाबदारी ओळखून सामाजिक एकरूपतेच्या भावनेतून एड्सला रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन ग्रामीण रुग्णालय न्हावी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजीत सरोदे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी केले त्यात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद करताना तरुणांची सामाजिक जबाबदारी ओळखून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एड्स जनजागृती अभियानासाठी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
यावेळी प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांनी उपस्थित स्वयंसेवक कॅडेट्स व विद्यार्थ्यांना सामूहिक शपथ दिली यात प्रत्येकाची वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी समजून एड्स होण्यापासून रोखण्यासाठीची काळजी कशी घ्यावी व एड्सग्रस्त रुग्ण सोबत प्रेमाने वागावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मनोज चव्हाण यांनी एड्स या महाभयंकर आजाराची कारणे, लक्षणे व बचावात्मक उपाययोजनांची सखोल माहिती दिली.
महाविद्यालयात ‘रेड रिबीन क्लब’ च्या माध्यमातून विद्यार्थी- विद्यार्थिनींचा गट तयार करून महाविद्यालयात व विविध उत्सव प्रसंगात एड्स जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अभिजीत सरोदे, मनोज चव्हाण, समुपदेशक आयसीटीसी सेंटर, पूर्णिमा चौधरी, लॅब टेक्नीशियन, आयसीटीसी सेंटर ग्रामीण रुग्णालय, प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, लेफ़्ट. डॉ. राजेंद्र राजपूत, एनसीसी अधिकारी, प्रा. शेरसिंग पाडवी, डॉ. राजेंद्र ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लेफ्ट. डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले तर आभार प्रा. शेरसिंग पाडवी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापन मंडळ, प्रशासन, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, नितीन सपकाळे, शेखर महाजन, चेतन इंगळे, सिद्धार्थ तायडे, अशराज गाढ़े, अशपाक शेख, चेतन मराठे, विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी मार्गदर्शन व परिश्रम घेतले.