आठ दिवसात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला देण्याची ग्वाही- ना. जयंत पाटील

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील चितेगाव, मुंदखेडा, कोदगाव येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला आठ दिवसात देण्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आयोजित एका बैठकीत दिली. यावेळी मा. मंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण व पिडीत शेतकरी उपस्थित होते.

चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव, मुंदखेडा, कोदगाव व ओढरे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने ह्या कवडीमोल भावाने खरेदी केल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर अक्षरशः अन्याय झाला आहे. त्यामुळे धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी मा. मंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण, पंचायत समिती गटनेते संजय भास्कर पाटील यांच्यासह पिडीत शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट मुंबई येथे घेतली. व बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत धरणग्रस्त शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आपली व्यथा मांडली. दरम्यान या गंभीर समस्यांवर कसे मार्ग काढून समस्या मार्गी लावता येईल यासाठी माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार मंगेशदादा चव्हाण, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील आणि शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा केली. यामुळे सुचविलेल्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात येईल व येत्या ८ दिवसात सर्व आढावा पूर्ण करून नियोजन विभाग आणि अर्थ विभागाशी बैठक करून सदर शेतकऱ्यांना मोबदला देण्याची सोय करण्यात येईल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिली. तब्बल दोन तास चर्चा करण्यात आल्यानंतर बैठक पार पडली. तत्पूर्वी तात्काळ उपाययोजना म्हणून पुरवणी मागणी मांडून २८० कोटी रुपये तापी महामंडळास उपलब्ध करून शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचा शब्द देखील जलसंपदामंत्री यांनी यावेळी दिला.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शेषराव बापू पाटील, पातोंडा येथील प्रभाकर पवार, छोटू पाटील, जितेंद्र येवले, सुखदेव शिंपी, मुरली अहिरे, गजानन माळी, दिलीप पाटील, पांडुरंग आधार माळी, अशोक वाबळे, बी. ओ. पाटील, चितेगाव येथील निवृत्ती अण्णा कवडे, राजेंद्र कवडे, भगवान भोसले, रविंद्र होनसिंग पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content