जळगाव,प्रतिनिधी| गेल्या तीस वर्षांत तीन ते चारवेळा अपघाती भेट झालेल्या सख्ख्या बहिणी ह्या अखेर भाऊबीजेच्या निमित्ताने पावन दिवशी एका छताखाली आल्या आहेत. छोट्या बहिणीने अचानक सरप्राइज दिल्यामुळे अनोख्या पद्धतीने तिचे स्वागत करण्यात आले.
जळगाव शहरातील एम.जे.कॉलेज मागे लक्ष्मीनगर येथे मीनाक्षी विश्वजीत चौधरी हे पती व मुलीसह वास्तव्यास आहेत. त्यांचे माहेर सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज गावामधील आहे. त्यांची आईची व त्यांची त्यांचे वय दीड वर्षाचे असतानाच कौटुंबिक कलहामुळे ताटातूट झाली होती. त्यामुळे मिनाक्षी यांची सख्खी बहीण दिपाली अमित कांबळे यांच्याशी त्यांची भेटच नव्हती.
मीनाक्षी चौधरी यांना त्यांचे आजी, आजोबा व वडिलांनी तसेच ज्येष्ठ आत्या यांनी सांभाळ केला. शिक्षणानिमित्त मीनाक्षी चौधरी या जयसिंगपूर, हातकणंगले, कोल्हापूर शहर येथे राहिल्या. दरम्यान, त्यांच्या बहिणीशी उभ्या आयुष्यामध्ये चार ते पाच वेळा भेटी झाल्या, मात्र या सर्व भेटी केवळ काही मिनिटांच्या ठरल्या. एकमेकांच्या घरी जाणे, भेटणे, काही दिवस राहणे असे कधीही झाले नाही.
दीड वर्षापूर्वी मीनाक्षी व दिपाली यांचे आजोबा अमृता गणू कांबळे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या उत्तर क्रियेच्या कार्यक्रमानिमित्त कसबे डिग्रज गावात मीनाक्षी चौधरी यांना त्यांची आई आणि बहीण दिपाली यांची भेट झाली. भेटीमध्ये त्यांच्याबरोबर गप्पा झाल्या. यानंतर मग दूरध्वनीवरून सातत्याने दोन्ही बहिणी संपर्कात आल्या. त्यातूनच आमच्याकडे काही दिवस राहायला या म्हणून मीनाक्षी चौधरी यांनी बहिणीला गळ घातली होती. त्यानुसार दीपाली कांबळे त्यांचे पती अमित कांबळे, तिन्ही मुले यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे येथून भाऊबीज निमित्त जळगाव शहरात आले आहे. जळगाव मध्ये पहिल्यांदाच ते आले आहे.
धाकटी बहीण दीपाली कांबळे त्यांच्या कुटुंबासह सकाळी येताच बहिण मिनाक्षी यांना इतका आनंद झाला की, तिने रांगोळ्या काढून त्यावर फुलांची सजावट करीत अंगण सजविले. तसेच त्यांचे औक्षण करून फुलांच्या पाकळ्या टाकत त्यांचे शाही स्वागत केले. यामुळे बहिण दिपाली आणि त्याचे कुटुंब स्वागताने भारावून गेले. तसेच दोघा बहिणींनी बहीण बीज देखील आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली.