मुख्यमंत्र्यांनी दिले नगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या चौकशीचे निर्देश

मुंबई, वृत्तसेवा | अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू ओढवला आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

 

आगीची घटना कळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत. अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये सर्वच रुग्ण होरपळून जखमी झाले आहेत. त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. तर इतर रुग्ण जखमी आहेत. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

 

दोषींवर कारवाई करा : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस

या दुर्घटनेनंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं, नगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

 

Protected Content