हे तर शिवसेनेच्या विचारांचे सीमोल्लंघन ! – ना. गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी । शिवसेनेचा विचार हा समाजकारणाचा आहे, सर्वसामान्यांच्या सेवेचा आहे अन् अर्थातच धगधगत्या हिंदुत्वाचा आहे. आज दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांच्या माध्यमातून शिवसेनेने महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदाच मोठे यश संपादन केले आहे. दादरा नगर हवेली ही गुजरातच्या आधी लागते. म्हणजेच गुजरातवर स्वारीच्या आधी हे पक्षाला मोठे यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. विशेष बाब म्हणजे या मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उपनेते ना. गुलाबराव पाटील यांनी चार सभा घेतल्या असून याला उदंड प्रतिसाद मिळाला होता.

दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील खासदार मोहन बेलकर यांच्या आत्महत्येनंतर झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला आहे. यात शिवसेनेच्या उमेदवार तथा दिवंगत मोहन बेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी दणदणीत एकतर्फी विजय संपादन केला आहे. कलाबेन यांच्या प्रचारासाठी ना. गुलाबराव पाटील यांनी मतदार संघामध्ये चार सभा घेतल्या होत्या. यामुळे हा विजय हा गुलाबराव पाटील यांना सुखावणारा ठरला आहे.

त्यांनी या निकालावर अगदी भरभरून प्रतिक्रिया देताना सांगितले की,  शिवसेनेला राष्ट्रीय राजकारणात आधीच महत्वाचे स्थान आहे. तर आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाची व्याप्ती महाराष्ट्राच्या पलीकडे होणार असून याचीच चुणूक कलाबेन डेलकर यांच्या विजयातून दिसून आली आहे. ते पुढे म्हणाले की दादरा, नगर, हवेली, दमण, दीव आदी परिसरात मराठी लोक मोठ्या संख्येने राहतात. या सर्वांना शिवसेनेचा विचार आधीच आवडत असला तरी पर्याय नव्हता. आता कलाबेन यांच्या रूपाने पर्याय मिळाल्यानंतर मराठी जनांनी पक्षाला भरभरून मतदान केले असून यातून हा ऐतिहासीक विजय साकारला आहे.

ना. पाटील पुढे म्हणाले की हा विजय हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांचा, पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या मुरब्बी आणि काळाचा अचूक वेध घेणार्‍या नेतृत्वाचा आणि आदित्यजींच्या नव्या युगाची भाषा बोलणार्‍या शिवसेनेचा विजय आहे.

दादरा, नगर, हवेली परिसरातील आपल्या प्रचार सभांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. याचेच प्रतिबिंब निकालातून उमटल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.  गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content