चोपडा प्रतिनिधी | चोपडा शेतकरी सहकारी कारखाना लवकरच सुरू होणार असून तो शेतकरी हितासाठी पूर्ण क्षमतेने चालविणार असल्याचे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. ते येथील कार्यक्रमात बोलत होते.
आमदार रोहित पवार यांनी आपल्या जिल्हा दौर्यात चोपडा येथे भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत पालिकेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, घनश्याम अग्रवाल, चंद्रहास गुजराथी, पालिकेचे गटनेते जीवन चौधरी, आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार रोहीत पवार म्हणाले की, चोसाकाचा हंगाम ५ नोव्हेंबरच्या आधी सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येथे कामगारांच्या मुलांना कामावर घेण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. या ठिकाणी व्यापार चांगला आहे. कारखाना सुरू व्हावा, यासाठी नेत्यांनी मागणी लावून धरली. त्याची दखल घेत आम्ही चोसाका घेण्यासाठी प्रयत्न केला. शेतकरी हितासाठी हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालविणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.