मुंबई । अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला कोर्टाने दणका देत जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात २ ऑक्टोबरला एनसीबीकडून अटक करण्यात आलेली असून तो सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहे. कोर्टानं आर्यनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. आज आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी एनडीपीएस कोर्टात आज पार पडली. मात्र, आर्यन खानला कोर्टाने दणका देत जामीन फेटाळून लावला आहे.
आर्यन खान आणि एका अभिनेत्रीमध्ये चॅटिंग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान, एनसीबीच्या पथकाने आरोपींचे जे चॅट कोर्टासमोर ठेवले आहेत. त्यामध्ये आर्यन खान आणि या अभिनेत्रीमध्ये झालेल्या चॅटचाही समावेश आहे. याशिवाय आर्यन खानचे काही ड्रग्स पेडलरसोबतचे चॅटही कोर्टात सोपवण्यात आले आहेत.
एनसीबीने आर्यन खानला जामीन देण्यात येऊ नये यासाठी एनसीबीने आपले म्हणणे मांडले होते. कोर्टामध्ये त्यावरून दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. आर्यन खानचे इंटरनॅशनल ड्रग्स पेडलर्ससोबत संबंध असल्याचा दावा एनसीबीने कोर्टात केला. तसेच हा मोठा कट असून, ज्याचा तपास होण्याची आवश्यकता आहे, असे एनसीबीने म्हटले आहे.