पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील आसनखेडा येथील व्यक्तीने जळगावातील सेवानिवृत्त माजी सैनिकाच्या खात्यातून शासनाने दिलेली अतिवृष्टीची अनुदानित रक्कम परस्पर काढण्याचा प्रकार उघडकीला आला आहे.
याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, प्रकाश वामन पाटील (वय-६३) रा. आनंद नगर, पिंप्राळा जळगाव यांचे आसनखेडा ता. पाचोरा शिवारात शेत आहे. दरम्यान गावातील नारायण बाळू जाधव रा. आसनखेडा ता. पाचोरा जि. जळगाव याने 2019-20 च्या आर्थिक वर्षात अवकाळी पाऊस अतिवृष्टी शासनाची अनुदानित रक्कम ८ हजार ९६० रुपये प्रकाश पाटील यांना न सांगता त्यांच्या खात्यातून बनावट सही करून परस्पर काढल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी प्रकाश पाटील यांनी पाचोरा पोलिस ठाण्यात धाव घेऊन नारायण जाधव यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार रामदास चौधरी करीत आहे.