पाचोरा, प्रतिनिधी । येथील सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या प्रथित यश गिरणाई पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच घेण्यात आली. सभासदांनी ऑनलाईन व ऑफलाईन उपस्थिती नोंदवली. संस्थेचे अध्यक्ष सतिश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न गिरणाई पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
गिरणाई पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष पंडित शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष नीरज जैन, संचालक अरूण शिंपी, अॅड. जिवाजीराव काटकर, अनिल वाघ, रुपेश शिंदे, श्रीराम पाटील, सिंधुताई शिंदे व शैलेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील नामांकित पतसंस्थापैकी एक असलेल्या पाचोरा येथील गिरणाई पतसंस्थेचा सहकार क्षेत्रात खूप मोठा नावलौकिक आहे. यंदाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे अध्यक्ष सतिश शिंदे यांनी संस्थेच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश झोत टाकला. संस्थेचे वसूल भागभांडवल १ कोटी ६७ लाख रुपये असून २६ कोटी २९ लाख रुपयांच्या ठेवी या पतसंस्थेत आहेत. संस्थेने २१ कोटी ४२ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले असून या वर्षी संस्थेला ३३ लाख ४४ हजार रुपये नफा झालेला आहे. संस्थेची एकूण गुंतवणूक १४ कोटी ४३ लाख रुपये असून थकबाकी फक्त ५ टक्के एवढी आहे.
पाचोरा येथील गिरणाई पतसंस्थेच्या नवीन कार्यालयात आधुनिक लॉकर सुविधा उपलब्ध असून केवळ ९ टक्के व्याज दराने सोनेतारण कर्ज उपलब्ध आहे. संस्थेचे पाचोरा, चाळीसगाव व भडगाव येथे गोदाम उपलब्ध असून त्यावर केवळ १० टक्के व्याज दराने माल तारण कर्ज उपलब्ध करून दिले जाते. संस्थेच्या पाचोरा सह चाळीसगाव व भडगाव येथे शाखा असून सर्व शाखा स्वमालकीच्या जागेत यशस्वीरित्या प्रगतीपथावर कार्यरत आहेत. या संस्थेतर्फे टर्म लोन मध्ये नियमित हप्ते भरणाऱ्या व कॅश क्रेडिट कर्ज खात्यात नियमित व्याज भरणाऱ्या कर्जदारांना व्याजात एक टक्के सूट म्हणजेच रिबेट देण्याचे सतिश शिंदे यांनी जाहीर केले. तसेच सभासदांचे गुणवंत पाल्य यांना बक्षीस व प्रशस्तिपत्रक वितरणाचा कार्यक्रम लवकरच घेण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. कोरोना आजाराच्या महा मारीत जगातील अनेक वित्तीय संस्था अडचणीत आल्या असल्या तरी गिरणाई पतसंस्थेच्या प्रगतीचा वेग मात्र कधीही मंदावला नाही. जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अग्रणी असलेले सुप्रसिद्ध उद्योजक सतिश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गिरणाई पतसंस्था दरवर्षी प्रगती पथाकडे वाटचाल करीत आहे. कोविड आजारात मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरुवात झाली. संस्थेचे व्यवस्थापक पुरूषोत्तम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वर्गाने या सभेचे ऑनलाईन व ऑफलाईन संचलन यशस्वीरीत्या केले.
संस्थेचे उपाध्यक्ष नीरज मुणोत यांनी सूत्रसंचालन केले. तर व्यवस्थापक पुरूषोत्तम चव्हाण यांनी आभार मानले. या सर्वसाधारण सभेच्या यशस्वीतेसाठी अनिल पवार, ईश्वर गायकवाड, संदीप देशमुख, संतोष मोरे, बबन जाधव, मच्छिंद्र पाटील, अमित नागणे, लिलाधर चौधरी, हर्षल पाटील, विकी वाडेकर, सचिन सावंत, दीपक नागणे, प्रशांत पाटील, सम्राट पाटील, महेंद्र पाटील व प्रमोद ठाकूर यांनी परिश्रम घेतले.