धरणगाव प्रतिनिधी | चाळीसगाव येथे होणार्या खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषदेला समविचारी बंधू-भगिनींनी उपस्थित राहून ही परिषद यशस्वी करण्याचे आवाहन राजेंद्र वाघ यांनी केले आहे.
रविवार २६ सप्टेंबर, २०२१ रोजी चाळीसगाव येथे खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषद महात्मा ज्योतिराव फुले स्थापित सत्यशोधक समाज २४ सप्टेंबर, २०२१ रोजी १४८ वर्ष पूर्ण होत आहेत. या दिनाचे औचित्य साधून चाळीसगाव येथे खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषद आयोजित करण्यात येत आहे. ही परिषद वैभव मंगल कार्यालय, भडगाव रोड, चाळीसगाव येथे संपन्न होणार आहे. या परिषदेत प्रमुख्याने खालील दोन सत्रात सत्यशोधक चर्चा घडवून आणली जाणार आहे.विषय – १) नवीन कृषी विधेयक २०२० काय आहे ? हे विधेयक कोणाच्या हिताचे ? या सत्राचे उदघाटन प्रतिभाताई शिंदे (अध्यक्ष लोकसंघर्ष मोर्चा ) या करणार आहेत. या सत्राचे अध्यक्ष विश्वासराव पाटील ( अध्यक्ष गावरान जागल्या सेना ) हे करतील. २) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० काय आहे ?… या सत्राचे उदघाटन बाळासाहेब कर्डक ( नाशिक विभागीय अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ) हे करतील व या सत्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रभाकर गायकवाड (औरंगाबाद) हे असतील. तसेच, महाराष्ट्रभर गाजलेले मी ज्योतिराव फुले बोलतोय ! एकपात्री प्रयोगाची झलक नटश्रेष्ठ कुमार आहेर ( पुणे )हे सादर करतील.
दरम्यान, या ऐतिहासिक खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषदेचे साक्षीदार व्हा !…. असे आवाहन ओबीसी पिछडा मोर्चा चे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य तसेच बहुजन क्रांती मोर्चा, धरणगाव चे तालुका संयोजक राजेंद्र वाघ यांनी केले आहे. या परिषदेला विचारांची मेजवानी मिळणार आहे. राष्ट्रपिता – तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले म्हणतात, न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता यांच्या पायावर अवघ्या मनुष्यजातीचे एक कुटुंब निर्माण करणे, हेच मनुष्यतत्त्वाचे सर्वोच्च ध्येय असून याच विचारांवर असलेला सत्यशोधक समाजाच्या तत्वांची मांडणी केली पाहिजे.
आपण महापुरूषांचे अपूर्ण राहिलेलं काम आपल्याला पूर्ण करण्यासाठी व सत्यशोधक परिषद पुनर्जीवित करण्यासाठी या परिषदेचे साक्षीदार व्हा !….. साक्षीदार व्हा !…. असे प्रतिपादन आबासाहेब वाघ यांनी केले आहे. तरी कोरोनाचे सर्व नियम पाळून बहुजन समाज बांधवांनी सदर ऐतिहासिक परिषदेस उपस्थित रहावे. असे आवाहन खानदेश स्तरीय सत्यशोधक परिषद समितीचे अध्यक्ष भीमराव खलाणे, कार्याध्यक्ष प्रा.गौतम निकम, अरविंद खैरनार, सत्यशोधक भगवान रोकडे तसेच खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषदेचे सर्व कार्यकर्त्याकडुन करण्यात आले आहे.