जळगाव, जितेंद्र कोतवाल | आपल्या राजकीय विरोधकांनाही सन्मान देऊन जनहितासाठी त्यांची सोबत करण्याचा आपला पॅटर्न पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज पुन्हा नव्याने दाखवून दिला आहे. शिरसोली येथील कार्यक्रमात ना. पाटील यांच्यासह गुलाबराव देवकर आणि खासदार उन्मेष पाटील यांच्यासोबत एका व्यासपीठावरील या या सर्व नेत्यांची देहबोली ही अतिशय आश्वासक दिसून आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील राजकीय वैमनस्य टोकाला गेले आहे. नेत्यांनी एकमेकांना संपविण्याचे प्रयत्न केले असून यामुळे राजकारण गढूळ झाले आहे. या पार्श्वभूमिवर, कधी काळी खूप आक्रमक असणारे ना. गुलाबराव पाटील यांनी जनहिताच्या मुद्यांवर पक्षीय जोडे बाहेर काढून अन्य पक्षाच्या नेत्यांना दिलेला सन्मान हा राजकीय वर्तुळात कौतुकाचा विषय बनला आहे. गेल्या काही दिवसांमधील घटना याचीच साक्ष देणार्या ठरल्या आहेत.
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमात चाळण प्रणालीला भाजपचे दिवंगत नेते हरीभाऊ जावळे यांच्या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांनी हजेरी लाऊन हरीभाऊंच्या स्मृतींना उजाळा दिला. यानंतर भुसावळ येथील कार्यक्रमात भाजपचे आमदार संजय सावकारे आणि नगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांचे कौतुक केले. अलीकडेच चाळीसगाव आणि जामनेर तालुक्यातील आपत्तीच्या प्रसंगी देखील ना. पाटील यांनी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह आ. मंगेश चव्हाण यांना सोबत घेऊन पाहणी केली. अलीकडेच त्यांनी आ. गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी भेट देऊन नंतर महाजन आणि संजय गरूड या दोन्ही राजकीय विरोधकांना आपल्या वाहनात बसून नुकसानीची पाहणी केली.
यानंतर आज शिरसोली येथील डॉ. अर्जुन पाटील यांच्या गुरूकृपा हॉस्पीटलचे नवीन वास्तूत स्थलांतर करण्याच्या कार्यक्रमात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह खासदार उन्मेषदादा पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर यांच्यात चांगलीच चर्चा रंगली. एकमेकांचे राजकीय विरोधक असणारे नेते हे सार्वजनीक कार्यक्रमाच्या व्यासपीठावर एकत्र आल्याने उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. यातील गुलाबराव पाटील विरूध्द गुलाबराव देवकर आणि उन्मेश पाटील विरूध्द गुलाबराव देवकर यांच्यात निवडणुकीमध्ये थेट टक्कर झालेली आहे हे विशेष. मात्र शिरसोली येथील आजच्या कार्यक्रमात जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातील एकोप्याचा एक नवीन सकारात्मक संदेश गेलाय हे मात्र निश्चित. याचे श्रेय अर्थातच ना. गुलाबराव पाटील यांना जाते.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारानेच जिल्हा बँक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे विशेष. खरं तर शिवसेनेतील अंतर्गत कलह हा काही दिवसांपूर्वी उफाळून आला असतांना ना. पाटील यांनी आमदार चिमणआबा पाटील यांच्यासोबत जाहीरपणे मतभेद मिटल्याचे सांगून बेरजेची भूमिका घेतली आहे. यानंतर आता विरोधी पक्षातील मातब्बर नेत्यांसोबत सलोख्याच्या संबंधातून त्यांनी पुन्हा एक सकारात्मक संदेश दिला आहे.