कुऱ्हाड खु॥ येथे दहावीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील कुऱ्हाड खु॥ येथील दहावीचे शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. एकुलता एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबाने एकच आक्रोश केला असून गावात शोककळा पसरली आहे.

येथील तुकाराम महारु चौधरी हे इलेक्ट्रिक मोटारी रिवाईंडिंग करून आपल्या संसाराचा रहाटगाडगा ओढत आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा दिनेश तुकाराम चौधरी हा दुपारी २ वाजेपासून निदर्शनास न आल्याने गावातील त्याचे मित्र मंडळी व आई वडिलांनी शोध घेतला. गावा जवळील अनेक विहरी व पाझर तलावात शोध घेतल्यानंतर तुकाराम चौधरी यांच्या मालकीच्या शेतातील कुऱ्हाड बु” शिवारात विहीरीवर जाऊन पाहिले असता तो नजरेस न पडल्याने उपस्थितांमधील एकाने इलेक्ट्रिक मोटारीला बांधलेला दोर वर ओढून बघितला त्यावेळी चि. दिनेश हा इलेक्ट्रिक मोटार व दोरीच्या मध्ये मृत अवस्थेत अडकलेला आढळून आला. एन पोळ्याच्या दिवशी अतिशय वाईट घटना घडल्याने व एकुलता एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दोन्ही गावात शोककळा पसरून गावकऱ्यांनी पोळा न साजरा करण्याचा निर्णय घेतला. दोन मुलींच्या पाठीवर झालेला एकुलता एक मुलगा वारल्याने आई वडिलांनी मोठा आक्रोश केला होता. दिनेश याच्यावर रात्री ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तो येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी होता.

 

Protected Content