जळगाव प्रतिनिधी । शहरातील निमखेडी शिवारात घराच्या गच्चीवर एसीच्या कॉम्प्रेसरमधील वीजेच्या धक्क्याने एका ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी तीन वाजता निमखेडी शिवारातील विठ्ठलवाडीत घडली. आईच्या डोळ्यादेखतच घटना घडल्यानंतर तिने मुलगा केशवला रुग्णालयात हलवित असतांना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.
निमखेडी शिवारात केशव ललीत चव्हाण (वय ६) असे मयत बालकाचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, ललीत चव्हाणा हे वडील सुरेश चव्हाण, आई अलका, पत्नी दिव्या व मुलगा केशव अशांसह वास्तव्याला आहेत. चव्हाण यांचे बी.जे.मार्केट येथे न्यू प्रकाश ट्रेडर्स नावाचे सबमर्सीबल इलेक्ट्री शॉप आहे. ललीत चव्हाण यांची पत्नी दिव्या या आज गुरुवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता गच्चीवर वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी गेल्या असता मुलगा केशव देखील त्यांच्या मागे गेला. आई कपडे काढत असताना केशव हा खेळत होता. खेळतानाच गच्चीवरीच एसीच्या कॉम्प्रेसरला धक्का लागला. त्यात वीज प्रवाह असल्याने केशव जागेवरच कोसळला. केशवला रुग्णालयात हलवित त्याचा वाटेतच मृत्यू झाला. दिव्या व ललित यांना केशव हा एकुलता मुलगा होता. या घटनेमुळे या दाम्पत्याला मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात नोंद करण्याचे काम सुरु होते.