चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील मगर दवाखान्यासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञाताने लांबवल्याची घटना उघडकीला आली असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, दिलीप झिपरू पाटील (वय-६१) रा. वाघडू ता. चाळीसगाव हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहेत. दरम्यान पाटील हे ३० ऑगस्ट रोजी खासगी कामानिमित्त चाळीसगाव शहरात आपल्या दुचाकीवर (क्र. एम.एच.१९ डी.एच.०५५८) आलेले होते. त्यांनी मगर दवाखान्या समोर उभी केलेली दुचाकी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. त्यावर रेल्वे स्थानक, भडगाव रोड, बस स्थानक व घाटरोड आदी ठिकाणी त्यांनी आजपावेतो शोधाशोध केली असता दुचाकी मिळून आली नाही. म्हणून ३० हजार रुपये किंमतीची बजाज कंपनीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्याने दिलीप झिपरू पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम-३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास भुषण पाटील हे करीत आहेत.