जळगाव प्रतिनिधी । मेहुणे घराबाहेर गेल्यानंतर शालकानेच बनावट चावीचा वापर करुन घरातून रोकड व दागिने असा ५१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सिंधी कॉलनीत घडली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला पोलिसांनी आज अटक केली आहे.
शालक भारत अनिल कुकरेजा (वय-२९ रा. दौलत नगर, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन हिरालाल लालवाणी (वय ३२, रा. सिंधी कॉलनी) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. पवन लालवाणी हे खासगी नोकरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. २० ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास ते घराला कुलूप लावून कामाला निघून गेले. सायंकाळी ६.३० वाजता घरी आले तेव्हा घराचे कुलूप उघडलेले दिसून आले. चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करून कपाटातील २२ हजार ५०० रूपयांची रोकड आणि २९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकुण ५१ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. लालवणी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, हे बंद घर फोडण्यासाठी बनावट चावीचा वापर केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी लालवाणी यांच्या कुटुंबीयांची माहिती घेतली. यावेळी लालवाणी यांचा शालक भारत हा अट्टल घरफोड्या असून तो घटनेच्या दिवशी शहरात असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीसांनी तपास केला असता तो उल्हासनगर येथे पळुन गेला होता. आज २ सप्टेंबर रोजी तो जळगावात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सचिन मंुढे, गोविंदा पाटील, सचिन पाटील यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली. भारत याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून लालवाणी यांच्या घरातून चोरी केलेले सोन्याचे लॉकेट मिळुन आले आहे.