मुंबई: वृत्तसंस्था । मार्शलनी संजय राऊत यांना उचलले यापूर्वी मी असा प्रकार कधीच पाहिला नव्हता. राज्यसभेत त्या दिवशी घडलेला हा प्रकार म्हणजे संसद सदस्यांवरील हल्लाच होता, असं शरद पवार यांनी सांगितलं.
राज्यसभेतील गोंधळाची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सविस्तर माहिती दिली. मार्शल्सने महिलांना धक्काबुक्की केली असेही ते म्हणाले .
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पेगाससवर चर्चा करण्यास केंद्राने मान्यता दिली नाही. त्यामुळे विरोधकांनी त्यावर चर्चा करण्यासाठी पहिल्या दिवसापासून आग्रह धरला. सत्ताधाऱ्यांनी विमा विधेयक आणलं. आम्ही त्यांना हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्यास सांगितलं. त्यावर चर्चा व्हावी, ते घाईघाईत मंजूर होऊ नये, अशी आमची मागणी होती. पण त्यांनी ते विधेयक तसंच आणलं. त्यांनी तसंच आणलं म्हणून राज्यसभेतील महिला आणि पुरुष सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला. काही सदस्य हे वेलमध्येही गेले होते हे मान्य आहे. माझी सीट समोर आहे. त्यामुळे मला प्रत्येक व्यक्ती काय करते हे दिसतं. पलिकडच्या बाजूही मला दिसत होत्या. पण जे रणकंदन झालं ते माझ्यासमोर झालं, असं पवार म्हणाले.
विमा विधेयकावर चर्चा करू नका, अशी मागणी केल्यानंतर काही लोक वेलमध्ये गेले. तेव्हा संसदेच्या इतिहासात आणि माझ्या 54 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी पहिल्यांदाच 40 सुरक्षा अधिकारी संसदेत आलेले पाहिले. त्यांनी फिजिकली सदस्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काँग्रेसच्या दोन महिला सदस्या पुढे गेल्या. त्यांनाही ढकलण्यात आले. त्यातील एक महिला खासदार खाली पडली. त्यावेळी सर्व सदस्य त्यांना मदत करायला गेले. त्यामुळे अधिक धक्काबुक्की झाली, असं सांगतानाच सुरक्षा दलाचा ताफ्याने बळाचा वापर केला. या सुरक्षा दलाने एकप्रकारे संसद सदस्यांवर हल्लाच केला. 40 सुरक्षारक्षक आलेच कुठून. एरव्ही दहाएक सुरक्षारक्षक संसदेत येतात. पण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक आले, असंही ते म्हणाले.
सत्ताधारी पक्षाचा नेता भूमिका मांडतो. पण त्यावर बोलायला सात मंत्री बसले. याचा अर्थ त्यांची भूमिका कच्ची होती. त्यांची बाजू कमकूवत होती हे स्पष्ट होतं. हे सुद्धा मी पाहत होतो. ते अॅक्शन घेऊ शकतील. कारण त्यांच्याकडे बहुमत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
एक सदस्य आहेत. त्यांचं नाव संजय राऊत. ते माझ्या पलिकडेच होते. त्यांना अलगद उचलून धरलं. तुम्ही पाहिलं की नाही माहीत नाही. पण त्यांना फिजिकली उचललं. हे सर्व प्रकार तिथे झाले. हे कधीही असं झालं नव्हतं, असंही त्यांनी सांगितलं.