यावल प्रतिनिधी । तालुक्यातील परसाडे येथे सावखेडा सीम आरोग्य केंद्राच्या वतीने किशोरवयीन मुलींना योग्य व शास्त्रीय मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. नसीमा तडवी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
सविस्तर माहिती अशी की, सावखेडा सीम आरोग्य केंद्राच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी यांनी तालुक्यातील गावागावात जावून मुलींना मार्गदर्शन करत आहे. किशोरवयीन वयोगटातील मुला-मुली मध्ये शारीरिक व मानसिक बदल होत असतात. त्यांना अनेक प्रश्न व शंका निर्माण होत असतात. परंतु आपल्या समाजात लैंगिक ह्या विषयावर मोकळेपणाने बोललेच जात नाही. लैंगिक विषयावर असलेला गैरसमजुती वाढीस लागून त्याचे मानसिक व शारीरिक आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती असते. मुलींचे मानसिक व शारीरिक आरोग्य हे निरोगी व सशक्त असायला हवे. म्हणून किशोरवयीन वयोगटातील मुला-मुलींना योग्य व शास्त्रीय मार्गदर्शनाची गरज ओळखून डॉ.नसीमा तडवी गावागावात जाऊन किशोरवयीन मुलींसाठी हा उपक्रम राबवित आहेत.
परसाडे येथे गावात मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. शिबिरास मोठ्या संख्येने आदिवासी मुलीं सहभागी झाल्या होत्या. डॉ. नसीमा तडवी यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक समस्या, वैयक्तिक स्वच्छता, होणारे शारीरिक बदल व मासिक पाळी विषयी समस्या आदी विषयाबाबत आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. मुलींच्या शंका व समस्या जाणून घेऊन त्याचे निरसन केले. याप्रसंगी आरोग्य सेविका मेहमूदा तडवी , गटप्रवर्तक सरला तडवी,आरोग्यसेवक भुषण पाटीसंजय तडवी, अंगणवाडी सेविका संगीता तडवी आशासेविका,हिराबाई तडवी, फरीदा तडवी, समीर तडवी, सायरा तडवी यांनी यशस्वीरित्या नियोजन व आदींचे सहकार्य लाभले.