मुंबई प्रतिनिधी | काल मंत्रालयात आढळून आलेल्या दारूच्या बाटल्या या सध्याच्या काळातील नसून भाजपच्या राजवटीतील असल्याचा संशय व्यक्त करत या बाटल्यांची लॅबमध्ये तपासणी करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
काल मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आल्याचे वृत्त समोर येताच खळबळ उडाली आहे. यावरून भाजप नेत्यांनी राज्यातील सत्ताधार्यांना धारेवर धरले असतांना शिवसेनेचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी यावरून जोरदार पलटवार केला आहे. टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या प्रकरणी भाजपवरून सडकून टीका केली आहे.
या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, मंत्रालयात काही तरी बाटल्या सापडल्याचं भाजपचं म्हणणं आहे. त्याचा आम्हाला दिल्लीतून वास येत नाही तेवढा. आम्हाला कोणता वास काय कळत नाही. आता कोण वास घ्यायला गेलंय बाटल्यांचा हे पाहावं लागेल. पण मला कोण्या तरी अधिकार्याने सांगितलं की या साधारण दीड वर्षांपूर्वीच्या बाटल्यांचा हा खच आहे. या बाटल्या आताच्या नाही दीड वर्षापूर्वीच्या आहेत. कदाचित आमचं सरकार नसावं त्यावेळेला. या मधल्या संपूर्ण काळामध्ये मंत्रालयात कुणाचा वावर नव्हता. वर्षभर तर मंत्रालय बंदच होतं. आता हळूहळू सुरू झालं आहे. माणसं जात आहेत. आता या कोणत्या काळातील बाटल्या पडल्यात हे तपासण्यासाठी भाजपने त्या लॅबमध्ये पाठवाव्यात. किती जुन्या आहेत याचा शोध घ्यावा. तसेच महाराष्ट्राच्या मंत्रालयाला तुम्ही कशाला बदनाम करताय? असं राऊत म्हणाले.