जळगाव प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून प्रक्रिया सुरू असलेल्या जळगाव जिल्हा पोलीस दलातील बदल्या अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. यात एकूण ७७० कर्मचार्यांच्या बदल्यांची अधिसूचना जाहीर केली आहे.
जळगाव जिल्हा पोलीस दलात गेल्या काही दिवसांपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ही प्रक्रिया दरवर्षी पार पाडली जाते. तथापि, गतवर्षी कोरोनामुळे १५ टक्के तर यंदा २५ टक्के कर्मचार्यांच्या बदल्यांना मान्यता दिली होती. याच्या प्रक्रियेत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक व हवालदारपदाच्या बदलीस पात्र कर्मचार्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या होत्या. तर पोलिस नाईक व शिपाई यांच्या अर्जांवरून निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने बदल्या करण्यात आल्या असून याचे गॅजेट प्रसिध्द झाले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी हे गॅजेट जाहीर केले आहे. बदल्या झालेल्यांमध्ये १०९ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, २०८ हवालदार, २०१ पोलिस नाईक व २५२ पोलिस शिपाई अशा ७७० कर्मचार्यांचा समावेश आहे.
बदली झालेल्या काही कर्मचार्यांना मार्च २०२२ नंतर बदलीच्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. इतरांना लागलीच कार्यमुक्त करुन बदलीच्या ठिकाणी सोडावे असे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिले आहेत.