जळगाव प्रतिनिधी | कोणतीही खातरजमा न करता मालमत्तेच्या वर्णनात फेरफार करणार्या ग्रामसेविकेवर कारवाई करावी अन्यथा आपण स्वातंत्र्यदिनापासून उपोषण करू असा इशारा माजी सैनिकाने दिला असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे.
नांद्रा (ता. पाचोरा) येथील माजी सैनिक वसंतराव पाटील यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, त्यांनी उषा सुरेश पाटील यांना घर विक्री केले असून यातील वर्णनात ग्रामसेविकेने फेरफार केल्याचे आढळून आले आहे. नांद्रा येथील घर क्रमांक २१८ ही मालमत्ता खरेदी-विक्री करताना त्या गावाला सिटी सर्व्हे लागू आहे. असे असूनही सिटी सर्व्हेच्या उतार्यानुसार खरेदी न करता ग्रामपंचायतीच्या नमुना ८ च्या उतार्यावरून खरेदी केली. मालमत्ता दगड माती बांधकाम असूनही नमुना क्रमांक ८च्या उतार्यावर बखळ हे वर्णन दुसर्याच व्यक्तीच्या हस्ताक्षरात लिहिले आहे. त्यामुळे उतार्यावर मालमत्तेच्या वर्णनात परस्पर फेरफार झाले. खरेदी खतामध्ये दुमजली इमारतीबाबत नमूद नाही. एकूण क्षेत्राबाबत निम्मे क्षेत्र खरेदी देत, घेत असल्याबाबत वर्णन नमूद आहे. मालमत्तेचे एकूण क्षेत्रफळाबाबत सिटी सर्व्हेचा उतारा सादर केला नाही.
वसंतराव पाटील यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, त्यांनी उषा सुरेश पाटील यांना घर विक्री केले आहे. त्यांच्या ताब्यात दिल्याबाबत खरेदी खतात वर्णन नमूद असल्याचे पाचोरा बीडीओंनी अभिप्रायात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी २८ जानेवारी २०२१ रोजी चौकशी अहवाल दिला. त्यानुसार खरेदी करताना एकूण क्षेत्र ३९.९६ पैकी निम्मे क्षेत्र १९.९८ चौ.मी.मध्ये १० चौ.मी. दगड माती बांधीव घर व उर्वरित ९.९८ चौ.मी. बखळ जागा खरेदीचा उल्लेख आहे. उर्वरित क्षेत्र मालकाच्या नावाने असायला हवे होते; परंतु ग्रामसेवकाने पूर्ण दुमजली इमारत खरेदीदाराच्या नावे लावली. ग्रामसेविकेने खातरजमा न करता फेरफार करणे म्हणजे कर्तव्यात कसूर आहे. त्या कारवाईस पात्र असल्याचा अहवाल विस्तार अधिकारी डी.बी. सुरवाडे यांनी दिलेला आहे. त्या अनुषंगाने ग्रामसेविका वृषाली वाघ यांच्यावर कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा माजी सैनिक वसंतराव पाटील यांनी या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.