काबुल : वृत्तसंस्था । पुलित्झर पुरस्कारविजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकींचा मृत्यू अफगाणिस्तानात गोळीबारात नव्हे तर तालिबानने ओळख पटवल्यानंतर निर्घृण हत्या केली असा दावा अमेरिकेच्या एका मासिकाने केला आहे.
जागतिक प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कारविजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांचा अफगाणिस्तानामधील हिंसेचे वृत्तांकन करताना मृत्यू झाला होता.
सिद्दीकी हे अफगाणिस्तानमधील संघर्ष टिपण्यासाठी तिथे गेले होते. कंदहार शहराच्या स्पिन बोल्दाक भागात अफगाणी फौजा व तालिबान यांच्यातील संघर्षाचे छायाचित्रण करताना त्यांचा मृत्यू झाला. ‘वॉशिंग्टन एक्झामिनर’च्या वृत्तानुसार, पाकिस्तानसोबतच्या सीमा चौकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अफगाणी फौजा व तालिबान यांच्यात सुरू असलेल्या लढाईचे छायाचित्रण करण्यासाठी सिद्दिकी हे अफगाण नॅशनल आर्मीच्या पथकासोबत स्पिन बोल्दाक भागात प्रवास करत होते. एका सीमा चौकीपासून काही अंतरावर येऊन पोचल्यानंतर तालिबानच्या हल्ल्यामुळे हे पथक विभागले गेले आणि कमांडरसह काही लोक सिद्दिकीपासून वेगळे झाले. सिद्दिकी इतर ३ अफगाणी सैनिकांसोबत होते.
अहवालात म्हटले आहे की, हल्ल्याच्या वेळी सिद्दीकीला गोळी लागली म्हणून तो आणि त्याची टीम स्थानिक मशिदीत गेली, तिथे त्यांना प्राथमिक उपचार मिळाले. मात्र, मशिदीत एक पत्रकार असल्याची बातमी पसरताच तालिबान्यांनी हल्ला केला. सिद्दीकीच्या उपस्थितीमुळे तालिबान्यांनी मशिदीवर हल्ला केल्याचे स्थानिक तपासात उघड झाले.
तालिबानने त्याला पकडले तेव्हा सिद्दीकी जिवंत होते, असे या अहवालात म्हटले आहे. तालिबानने सिद्दीकीची ओळख पटवली आणि नंतर त्याची आणि त्याच्या साथीदारांची हत्या केली.