नवी दिल्ली : वृत्तसंस्था । खा संजय राऊत यांच्या निवासस्थानी बैठक असून, शिवसेनेचे सर्व खासदार उपस्थित आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पक्षाची व्यूहरचना ठरवण्याबाबत या बैठकीत चर्चा होत आहे.
एकीकडे संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना, दुसरीकडे शिवसेना खासदारांची दिल्लीत ‘लंच डिप्लोमसी’ पाहायला मिळत आहे.
शिवसेना खासदार अरविंद सावंत, सदाशिव लोखंडे, राहुल शेवाळे हे संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. खासदार विनायक राऊत , खासदार श्रीरंग बारणे, संजय मंडलिक, गजानन कीर्तिकर, हेमंत पाटील, अनिल देसाई, राजन विचारे, शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी, ओमराजे निंबाळकर असे सेनेचे खासदार संजय राऊतांच्या घरी दाखल झाले.
या बैठकीपूर्वी खासदार विनायक राऊत म्हणाले, “मराठा आरक्षणवर लोकसभेत चर्चा व्हावी यासाठी आम्ही स्थगन प्रस्ताव आणि नोटीस ऑफ अटेन्शन दिली आहे. त्याबाबत खुल्या चर्चेची मागणी केली आहे. आरक्षणासाठी 50 टक्केची मर्यादा ओलांडावी असा कायदा केंद्र सरकारने संसदेत मंजूर करावा, यासाठी शिवसेना प्रयत्न करेल”.
या बैठकीपूर्वी आज सकाळीच काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. राऊतांच्या घरीच ही भेट झाली.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस नेते आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कंबर कसली आहे. संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा होऊन त्यावर तोडगा निघावा म्हणून अशोक चव्हाण दिल्लीत आले आहेत. त्यांनी काँग्रेससह शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत लावून धरण्याची विनंतीही त्यांनी या नेत्यांना केली आहे