वाशिंग्टन : वृत्तसंस्था । सध्याचा कोरोना विषाणू चीनमधील वुहान येथून पसरलेला नसून तो प्राण्यांमधून माणसात पसरल्याने नैसर्गिकच आहे, असे वैज्ञानिक पुराव्यांची छाननी करून जागतिक वैज्ञानिक चमूने म्हटले आहे.
७ जुलैला झेनोडो या प्रिंट सव्र्हरवर संशोधनाची पडताळणी करून जाहीर करण्यात आलेले निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
अजूनही कोरोनाचा विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून पसरल्याचे मानले जात असून २१ वैज्ञानिकांनी याबाबत आतापर्यंत सादर करण्यात आलेल्या वैज्ञानिक पुराव्यांची छाननी करून मते मांडली आहेत. त्यांच्या मते हा विषाणू प्रयोगशाळेतून पसरलेला नाही. ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातील प्राध्यापक एडवर्ड होम्स यांनी म्हटले आहे की, आम्ही या पुराव्यांचे काळजीपूर्वक व समीक्षात्मक विश्लेषण केले असून त्यात हा विषाणू कुठल्याही प्रयोगशाळेतून आल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. या संशोधन निबंधातील निरीक्षणानुसार आधीचे जे विषाणू रुग्ण होते त्यांचा वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीशी संबंध नाही. हा विषाणू प्राण्यांच्या बाजारपेठेतून परसल्याच्या शक्यतेला दुजोरा देणारे साथरोगशास्त्रीय दुवे मात्र काही प्रमाणात आढ़ळून आले आहेत. कोरोना साथीपूर्वी वुहान विषाणू संस्था ही सार्स सीओव्ही २ या विषाणूवर संशोधन करीत होती याचे कुठलेही पुरावे नाहीत. वुहान संस्थेतून हा विषाणू सुटलेला नाही. सार्स सीओव्ही २ म्हणजे कोरोना विषाणू हा प्राण्यांमधून माणसात पसरला असण्याची दाट शक्यता आहे. वन्य प्राण्यांच्या व्यापारात माणसांचा संबंध नेहमीच या विषाणूशी आलेला असू शकतो. सार्ससारख्याच कोरोना विषाणूचा प्रसार वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये झाला होता. सार्स सीओव्ही २ निसर्गातून माणसात कसा पसरला याचा अभ्यास करण्यात आला होता.