मुंबई प्रतिनिधी । राज्यात तब्बल ६ हजार १०० शिक्षण सेवकांची आता लवकरच भरती होणार असून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
राज्य सरकारने प्रलंबित असलेल्या राज्यातील तब्बल ६ हजार १०० शिक्षण सेवकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत आता स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित, अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील, शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड.कॉलेज) शिक्षकांची सुमारे ६१०० रिक्त पदं भरली जाणार आहेत. आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सध्या लागू असलेल्या पदभरती बंदीतून शिक्षण सेवकांची भरती वगळण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता शिक्षण सेवकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी यासाठी पाठपुरावा केला. या अनुषंगाने आता ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.