पाचोरा प्रतिनिधी । नाशिक विभागीय बास्केटबॉल स्पर्धेत पाचोरा बास्केटबॉल संघाने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात मजल मारुन विजेते पद पटकावले आहे. तर उपविजेते पदी चाळीसगाव संघाला समाधान मानावे लागले आहे.
नाशिक विभागीय २३ वर्षांआतील ओपन बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन धुळे येथील धुळे डिस्ट्रीक्ट युथ फिजिक्स, एज्युकेशन अॅण्ड स्पोर्ट्स असोसिएशन अॅकेडमीतर्फे करण्यात आले होते. या स्पर्धेत धुळे, नाशिक, मालेगाव, बेटावद, चाळीसगाव, वरणगाव येथील संघांनी सहभाग घेतला होता. यात उत्तम कामगिरी करत पाचोरा व चाळीसगाव या संघामध्ये धुळे येथील चावरा स्कुलच्या ग्राऊंडवर अंतिम सामना रंगला. पाचोरा संघाने चाळीसगाव संघावर मात करत प्रथम पारितोषिक पटकावले. विजेता संघास चावरा स्कुलच्या पदाधिकाऱ्यांमार्फत सात हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट खेळाडुचा मान पाचोरा संघाचा यश महाले यास मिळला आहे. पाचोरा संघाला मुख्य प्रशिक्षक दिपक (आबा) पाटील व प्रशिक्षक जावेद शेख यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. विजयी संघाचे पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी अभिनंदन केले आहे.