चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वरखेडे लोंढे धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा पोहतांना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वरखेडे बुद्रुक येथील रहिवाशी हिरतसिंग जगतसिंग पवार व पुतण्या मृणाल इंद्रसिंग पवार हे काका पुतणे दोघे आज सकाळी ८ वाजता तालुक्यातील वरखेडे लोंढे येथील धरणावर पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान, पुतण्या मृणाल इंद्रसिंग पवार हा पाण्यात पोहत असतांना पाण्यातील जाळ्यात अडकला होता. पुतण्या पाण्यातून वर न आल्याचे पाहून काका हिरतसिंग पवार यांनी देखील पाण्यात उडी घेतली. यात दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर धाव घेवून दोघांचे मृतदेह काढण्यात आले. चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. या घटनेमुळे वरखेडे बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आज सायंकाळी ५ वाजता दोन्ही पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.