मुंबई: वृत्तसंस्था । पहिल्या टप्प्यात उद्यापासून जळगावसह १८ जिल्ह्यांतील निर्बंध पूर्णपणे उठवले जाणार आहेत. कोरोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे.
निर्बंध शिथील होण्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील जनतेला मोठा दिलासा देणारी ही बातमी आहे. राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध पाच टप्प्यांत शिथील होणार आहेत. उद्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली. लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारनं पाच स्तरीय योजना तयार केली आहे. संसर्गाचा दर आणि जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडची उपलब्धता हा निकष त्यासाठी लावण्यात आला आहे. रुग्णवाढीचा वेग अत्यंत कमी असलेल्या जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यातील निर्बंध पूर्णपणे उठणार असून सर्व दुकाने, उद्याने, थिएटर्स, सलून असं सगळं उघडण्यास परवानगी देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात अनलॉक होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, नागपूर, औरंगाबाद, चंद्रपूर, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नांदेड, नाशिक, परभणी, जालना, लातूर, यवतमाळ, वर्धा, वाशिम, जळगावचा समावेश आहे.
राज्यातील अनलॉकचे पाच टप्पे पुढीलप्रमाणे: पहिला टप्पा – सर्व निर्बंध उठवणार , दुसरा टप्पा – मर्यादित स्वरूपात निर्बंध उठवणार , तिसरा टप्पा – काही निर्बंधांसह अनलॉक , चौथा टप्पा – निर्बंध कायम , पाचवा टप्पा – रेड झोन. कडक लॉकडाऊन