जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील ममुराबाद येथील माहेर असलेल्या विवाहितेचा अपशकुनी म्हणत माहेरहून पैसे आणावे यासाठी छळ करणाऱ्या पतीसह सासू सासऱ्यांवर तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील ममुराबाद येथील माहेर आलेल्या पुजा सुरेश शिरसाठ (वय-२६) रा. बारडोली, सुरत (गुजरात) यांचा विवाह बारडोली, सुरत येथील सुरेश इगन शिरसाठ यांच्याशी झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर सासू आशाबाई इगन शिरसाठ आणि सासरे इगन शंकर शिरसाठी यांनी लहान लहान गोष्टींवर टोमणे मारणे सुरू केले. विवाहितेला अपशकून असल्याचे सांगून हिनवू लागले. घरासाठी सबसिडी मिळणार आहे, म्हणून माहेरहून पैसे आणावे यासाठी पती सुरेश शिरसाठ याने विवाहितेला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. सासरच्यांकडील हा छळ असहाय्य झाल्याने कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. शनिवारी रात्री उशीरात विवाहितेच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासू व सासरे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संजय भालेराव करीत आहे.