सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । कोरोनावर अद्यापही परिपूर्ण उपचार उपलब्ध नसतांना या संदर्भात गठीत करण्यात आलेल्या समितीवरील नियुक्तीमुळे आपल्याला राष्ट्रीय पातळीवर काम करणार मिळणार असून याचा आनंद होत असल्याचे प्रतिपादन डॉ. अतुल सरोदे यांनी केले. डॉ. सरोदे यांची कोविडच्या राष्ट्रीय समितीवर निवड झाल्यानिमित्त लाईव्ह ट्रेंडस न्यूजने साधलेल्या विशेष संवादात त्यांनी या समितीच्या कार्याचा सविस्तर उहापोह केला.
सावदा येथील प्रतिथयश फिजीशियन डॉ. अतुल गुणवंतराव सरोदे यांची केंद्रीय पातळीवरील कोविड-१९ पॅनडॅमीक : अॅन अॅप्रोप्रियेट बिहेवियर या समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. ही समिती आयसीएमआर व नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स या दोन ख्यातनाम संस्थांनी संयुक्तपणे गठीत केलेली आहे. कोरोनाच्या उपचारासाठी आजवर आयसीएमआरतर्फे वेळोवेळी निर्देश देण्यात आलेले आहेत. तथापि, हे निर्देश आणि उपचार पध्दती यांचा नेमका किती प्रमाणात उपयोग झाला ? याबाबतचे संशोधन ही समिती करणार आहे.
या संदर्भात डॉ. अतुल सरोदे म्हणाले की, खरं तर कोरोनावर वेळोवेळी उपचार बदलत गेले आहेत. मात्र आजही एखादी थेरपी ही यावर परिपूर्ण पध्दतीत उपयुक्त असल्याचे कुणीही सांगू शकत नाही. याबाबत सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. यामुळे केंद्रीय पातळीवरील या समितीच्या माध्यमातून कोरोनाच्या उपचाराला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. आणि याचा सर्वांनाच लाभ होणार आहे.
दरम्यान, याप्रसंगी डॉ. अतुल सरोदे यांनी खूप परखड मते देखील मांडली. ते म्हणाले की, भारतात लॉकडाऊन लागला तेव्हा पाचशे रूग्ण होते. ही संख्या आता लाखांवर गेली असल्याने तेव्हा कोरोना आटोक्यात आला नाही तर आता कसा येणार ? यावर विचार करावा लागणार आहे. आपल्याला आता कोरोना सोबतच जगायचे आहे. याचा प्रतिकार करण्यासाठी फिजीकल डिस्टन्सींग, मास्क आणि सॅनिटायझेशन ही त्रिसुत्रीच उपयुक्त ठरणार आहे.
तर, सध्या सुरू असणार्या लॉकडाऊनचा काहीही उपयोग नसल्याचे मत डॉ. अतुल सरोदे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, चार तास बाजारपेठ उघडी ठेवून नंतर निर्बंध लागण्याचा हा प्रकार चुकीचा आहे. या प्रकारचा दोन महिने लॉकडाऊन लावण्याऐवजी आठ दिवसांचा कर्फ्यू हा अधिक उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. यामुळे लॉकडाऊन ऐवजी आपल्याला याच्या प्रतिकारासाठी नवीन मार्ग शोधावा लागणार असल्याची आग्रही भूमिका डॉ. अतुल सरोदे यांनी याप्रसंगी मांडली.
खालील व्हिडीओत पहा डॉ. अतुल सरोदे यांची संपूर्ण मुलाखत
https://www.facebook.com/508992935887325/videos/527334601778081