मुंबई : वृत्तसंस्था । राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीकरता आवश्यक सेवेची अट १५ वर्षांवरून १२ वर्षे करण्याचा व जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी ५ वर्षांवरून २ वर्षांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला. आहे
या जवानांच्या प्रश्नांबाबत आज मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
या निर्णयासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या विनंतीवरुन एसआरपीएफ जवानांच्या या प्रश्नाबाबत समितीही गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार आज झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एसआरपीएफ जवानांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे. निर्णयामुळे एसआरपीएफ जवानांचे मनोबल उंचावणार असून अधिक कार्यक्षमतेने कर्तव्य बजावण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
या निर्णयाबद्दल आदित्य ठाकरे यांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांचेही आभार मानले आहेत.
. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस विभाग सातत्याने कार्यरत आहे. या काळातील बंदोबस्ताचे नियोजन, पोलीस कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा तसेच पोलिसांच्या अडचणींची माहिती वळसे पाटील यांनी घेतली.
राज्यात कडक निर्बंध लावले आहेत त्याची चांगली अंमलबजावणी होईल हे पाहताना आपला मुख्य उद्देश हा कोविडची संसर्ग साखळी तोडणे हा आहे हे लक्षात ठेवावे आणि कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी तसेच सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पोलीस कर्तव्य बजावत असताना त्यांना जनमानसात फिरावे लागते, यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या आरोग्याबाबतही दक्षता घ्यावी. संसर्ग झाल्यास तात्काळ उपचारासाठी रुग्णालय व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. पोलीस दलातील प्रत्येकाचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे लसीकरण करुन घ्यावे. त्यासाठी आवश्यक त्या सोयी सवलती उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश दिलीप वळसे पाटील यांनी दिले.