जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा मरीमाता चौकात भावाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरूणाला तीक्ष्ण हत्याराने पाठीमागे वार करून गंभीर जखमी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना रामानंद नगर पोलीसांनी अटक केली असून एक फरार आहे. तिघांना न्यायालयाने १५ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत सविस्तर असे की, भोला अरूण भोई रा. केदार नगर, मरीमाता चौक, पिंप्राळा हा तरूण ९ मे रोजी सकाळी ११ वाजता मरीमाता चौकात बसलेला होता. त्यावेळी गल्लीतील शुभम साहेबराव शिवदे (वय-२४), निखील साहेबराव शिवदे (वय-२२), सागर बाळू शिवदे (वय-१८) आणि सनी साहेबराव शिवदे रा. मरीमाता चौक पिंप्राळा या चौघांनी भोला याला काहीही कारण नसतांना मारहाण केली. त्यावेळी त्याठिकाणी नागरीकांनी गर्दी केली होती. दरम्यान भोला भाई रडत असल्याचे पाहून पवन अरूण भोई याने चौघांना जाब विचारला असता यातील शुभमन शिवदे यांने निखील शिवदे याने मागून येवून पाठीवर तिक्ष्ण हत्याराने वार केले. तर इतर तिघांनी दोन्ही भावांना बेदम मारहाण केली. जखमीवस्थेत पवन भोई याला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. पवन भोई यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा पुढील तपास सपोनि संदीप परदेशी यांच्याकडे आहे.
दरम्यान, गुन्ह्यातील शुभम साहेबराव शिवदे, निखील साहेबराव शिवदे, सागर बाळू शिवदे रा. मरीमाता चौक पिंप्राळा यांनी पोलीसांनी आज मंगळवारी अटक केली आहे. तर चौथा साथीदार सनी साहेबराव शिवदे हा अद्याप फरार आहे. जिल्हा न्यायालयात तिघांना हजर केले असता न्यायालयाने १५ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.