पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील मुंदाणे-करंजी-बोळे या दरम्यानच्या रस्त्याच्या कामाला लवकर सुरूवात होणार असून नागरीकांची गैरसोय दुर होणार आहे. रस्त्याची कामे लवकरात लवकर करावी अश्या सुचना आ. चिमणराव पाटील यांनी संबंधित अधिकारी वर्गाला केल्या आहेत.
तालुक्यातील वर्दळीचा व महामार्गाला बायपास असलेला मुंदाणे-करंजी-बोळे रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे तीन वर्षापूर्वी हस्तांतरित झाला होता. मात्र पुरेसा निधी न मिळणे व निकृष्ठ कामामुळे रस्त्याची भयंकर दुरावस्था झाली. परिणामी ग्रामस्थांची गैरसोय बदली. याबाबत वाढत्या तक्रारींची तात्काळ दखल घेत आमदार चिमणराव पाटील यांनी ११ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागचा अभियंत्यांसह या रस्त्याची पाहणी केली. यानंतर दोन्ही विभागांना तातडीने रस्त्याची दुरुस्ती व दर्जोन्नती मिळणेबाबतचा प्रस्ताव तयार करून सादर करण्याचा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. सदर प्रस्तावाबाबत आमदार चिमणराव पाटील यांनी शासन स्तरावर केलेल्या प्रयत्नांनी व वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याने महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाचा ५ मे २०२१ रोजीच्या शासन आदेशान्वये सदर रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देत रस्ते विकास योजना २००१-२१ मधील जळगाव जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यांच्या एकूण लांबीत २२.५०० कि.मी. ने वाढ होवून एकूण लांबी (३५७२.७५+२२.५००) म्हणजेच ३५९५.२५ कि.मी. इतकी तसेच इतर जिल्हा मार्ग रस्त्यांच्या एकूण लांबीत २२.५०० कि.मी. ने घट होवून एकूण लांबी (१२६८.७५-२२.५००) म्हणजेच १२४६.२५ कि.मी. इतकी करून दर्जोन्नती प्राप्त झालेली आहे. तसेच रस्त्याचे काम त्वरित सुरु करून ग्रामस्थांची होत असलेली गैरसोय तात्काळ दूर करावी अश्या सूचना आमदार चिमणराव पाटील यांनी संबधित अधिकाऱ्यांना केल्या.