जळगाव : प्रतिनिधी । शहरातील विकासकामांना सध्याच्या राज्य सरकारने राजकीय आकसातूनच स्थगिती दिलेली आहे ती आधी उठवावी असे सांगत आज भाजप जिल्हा कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी काल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले
भाजप कार्यालय झालेल्या या पत्रपरिषदेत स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील , ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे , भगत बालानी आदी उपस्थित होते . त्यांनी सांगितले कि , गिरीश महाजनांनी मंत्री असताना जळगाव शहरासाठी काहीच केले नाही असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही . स्थानिक प्रश्न आणि लोकांच्या अपेक्षांचा विचार केला तर गुलाबराव पाटील यांच्या गेल्या वर्ष — दिड वर्षातील भूमिका लक्षात घेऊन आम्हीसुद्धा त्यांना निष्क्रिय पालकमंत्री म्हणू शकतो . जी कामे शहरात सध्या सुरु आहेत त्यांच्या आणि निधीची मंजुरी मिळालेली आहे मात्र कामे सुरु होणे बाकी आहे अशा सर्व कामाच्या आराखड्याची आणि ठरावांची प्रक्रिया या आधी सत्तेवर असलेल्या भाजपच्या महापौरांच्या काळातच सुरु झाली होती . ठरावांची व कामांची अंतिम मान्यता राज्य सरकारकडून होत असते . अमृत योजनेतील पाणीपुरवठ्याची , पथदिव्यांची , मलनिःसारण वाहिन्यांची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत ती कामे करताना पालकमंत्री त्यावेळच्या भाजपच्या महापौरांना श्रेय नकोच अशी भूमिका घेणार आहेत का ? असा प्रश्नही यावेळी भाजप कडून उपस्थित करण्यात आला .
गिरीश महाजन मंत्री होते त्याकाळात जिल्ह्याला स्वतंत्र महिला रुग्णालय ( मोहाडी ) व सामान्य रुग्णालयात सध्या कार्यरत झालेले वैद्यकीय महाविद्यालय मिळाले वैद्यकीय महाविद्यालयासाठी शहराबाहेर कुसुम्बयाजवळ विस्तीर्ण जागा मंजूर झाली . या दोन्ही आरोग्य संस्था आज कोरोना संकटात जिल्ह्यासाठी महत्वाच्या ठरत आहे या दोन्ही संस्था अस्तित्वात आल्या नसत्या तर एकट्या सामान्य रुग्णालयाला कोरोना रुग्णांची काळजी घेणे झेपले गेले नसते . हा मुद्दा पालकमंत्री गुलाबराव पाटील अजिबातच मान्य करणार नाहीत का ? , असेही या भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले . आम्ही कामाची आणि निधीची मंजुरी मिळवताना कधीच पक्षपात केला नाही कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकाच्या प्रभागात आवश्यकतेप्रमाणे कामे झालीच पाहिजेत अशी भूमिका भाजपच्या आधीच्या महापौरांची होती , असे ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनावणे यांनी सांगितले .
सर्वात आधी त्याकाळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , गिरीश महाजन व आमदार राजूमामा भोळे यांनी जळगाव महापालिका ४५० कोटी रुपयांच्या कर्जाच्या त्रासातून मुक्त केली होती . आर्थिक त्रासात असताना शिवाजीनगरच्या पुलासाठी महापालिकेचा ३० टक्के वाट उभा करून तो भरला गेला ही कामे पालकमंत्री गुलाबराव पाटील विसरले आहेत का? गिरीश महाजन यांनी जळगाव शहरासाठी काहीच केले नाही असे म्हणण्याच्या त्यांच्या धोरणाला काय आधार आहे ? असेही हे भाजप पदाधिकारी म्हणाले
आधीच कामांचा आराखडा ७० कोटींवरून १२५ कोटींवर तत्कालीन जळगावच्या महापौरांनी नेला त्यासाठी आग्रह आणि मार्गदर्शन गिरीश महाजन यांचे होते हे आम्ही वारंवार सांगायलाच पाहिजे का ? असेही ते म्हणाले . कामाच्या प्रस्तावांच्या मंजुरीचा प्रवास जळगाव – नाशिक – मुंबई असा होत असती ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यात भाजपचे महापालिकेतील पदाधिकारी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे पक्षाचे नेते कुठेच नसतात ,असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना म्हणायचे आहे का ? , असेही ते म्हणाले .