मुंबई प्रतिनिधी । नाशिक महापालिकेच्या जाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सीजन गळतीमुळे मृत झालेल्या रूग्णांचा आकडा २२ झाला असून अजूनही काहींची प्रकृती खालावली असल्याने ही संख्या वाढण्याची भिती कायम आहे.
नाशिक येथील जाकीर हुसेन रूग्णालयात आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ऑक्सीजनची गळती झाल्याची माहिती समोर आली. याच्या पाठोपाठ या गळतीमुळे अत्यवस्थ अवस्थेत असणार्या अकरा रूग्णांचा मृत्यू झाला असून अजून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती. यानंतर काही वेळातच मृतांचा आकडा वाढल्याचे समोर आले आहे.
ताज्या वृत्तानुसार या दुर्घटनेत आतापर्यंत २२ रूग्णांचा मृत्यू झाला असून अजून काही रूग्ण अत्यवस्थ अवस्थेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. बळींचा आकडा वाढण्याची भिती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
तर दुसरीकडे, या प्रकरणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या संदर्भात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने याबाबत विचारणा केली असता त्यांनी यावर राजकारण करता कामा नये असे सांगितले. ते म्हणाले की, ही घटना अतिशय गंभीर असून याला महापालिका प्रशासन थेट जबाबदार आहे. यामुळे महापालिका आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.