लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय – पंतप्रधान

नवी दिल्ली । कोरोना विरूध्दची लढाई अजून संपलेली नसली तरी आपण चांगला प्रतिकार करत आहोत. यामुळे लॉकडाऊन हा आता अंतीम पर्याय मानायला हवा. आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचविण्याचे असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. आज देशवासियांनी संबोधित करतांना ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला संबोधित केले. ते म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट ही अतिशय भयंकर अशीच आहे. पहिल्या लाटेचा आपण मुकाबला केला असून आपण या लाटेचाही प्रतिकार करणार आहोत. यासाठी डॉक्टर्स, वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचे आभार व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी झाल्यास कोरोनाचा प्रतिकार यशस्वीपणे करता येणार आहे. देशभरात ऑक्सीजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून यावर केंद्र व राज्यांनी एकत्रीतपणे काम केले असून यामुळे प्राणवायूचा पुरवठा सुरळीतपणे होईल अशी अपेक्षा आहे. ऑक्सीजन रेल, ठिकठिकाणचे ऑक्सीजन प्लांट आदींच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे.

कोरोनाच्या लाटेत फार्मा कंपन्यांनी आपले तातडीने उत्पादन वाढविले असून यात अजून लवकरच वाढ होणार आहे. देशभरात ठिकठिकाणी कोरोना हॉस्पीटल्स व कोविड केअर सेंटर्स वाढत्या संख्येने सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग समोर येताच लसीकरणाचे प्रयत्न सुरू झाले. जगातील सर्वात जास्त व स्वस्त लसींचे उत्पादन भारतात झाले आहे. यामुळे जगातील सर्वात मोठे व्यापक लसीकरण भारतात सुरू झाले आहे. आतापर्यंत १२ करोड नागरिकांना लस देण्यात आली असून यात लवकरच वाढ होणार आहे. १ मे नंतर १८ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला लस देण्यात येणार आहे. लसींच्या उत्पादनापैकी अर्धा वाटा हा राज्यांसह खासगी रूग्णालयांना मिळणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. यापुढेही सरकारी रूग्णालयात मोफत लस मिळणार आहे.

कोरोनाचा प्रतिकार करतांना अर्थकारणावर परिणाम होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. गेल्यावेळेस कोरोनाचा प्रतिकार करतांना आपल्याला उपचाराबाबत माहिती देखील नव्हती. यात चाचणीची माहिती नव्हती. यावर नेमके काय औषध उपयुक्त आहे याची माहिती नव्हती. मात्र कमी वेळात यात सुधारणा झाली असून डॉक्टरांनी कोरोनाच्या प्रतिकाराची उत्तम प्रणाली विकसित केली आहे. आज पुरेसे पीपीई किट, चाचण्याची सुविधा आदी चांगल्या प्रमाणात आहेत. यासाठी लोकसहभाग देखील वाढलेला आहे. आज आपल्या भोवती अनेक जण चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करत आहेत. देशातील नागरिकांनी समाजाची सेवा करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन देशवासियांना केले.

स्वच्छता अभियानात बालकांनी खूप मोठी कामगिरी बजावली आहे. आता कोरोनाच्या आपत्तीत आपल्या घरातील कुणालाही घराबाहेर जाऊ देऊ नका असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असून यापासून बचावासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी सूचित केले. याऐवजी मायक्रो कंटेनमेंट झोनवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. राम नवमी निमित्त शुभेच्छा देत मर्यादा पुरूषोत्तम श्री रामाचे स्मरण केले.

Protected Content