पुणे प्रतिनिधी । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना अटक करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केली आहे.
आजच्या पत्रकार परिषदेत रूपाली चाकणकर यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या की, रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ब्रूक फार्माच्या मालकाला चौकशीसाठी बोलावलं होतं. परंतु त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरकारी कामात अडथळा आणला त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली असल्याचं त्यांनी सांगितले.
यासोबत त्यांनी अन्य भाजप नेत्यांवरही टीका केली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या असंवेदनशील आणि बेजबाबदार वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. राज्य सरकारांनी ऑक्सिजनच्या मागणीवर नियंत्रण ठेवावं अस या महाशयांचं म्हणणं आहे. आम्ही काय मौज मजेसाठी ऑक्सिजन मागतोय का? ऑक्सिजनच्या अभावी आमची मायबाप जनता मरणयातना भोगत आहे म्हणून आम्ही ऑक्सिजन मागतोय, तेही तुम्ही देऊ शकत नसाल तर असं सरकार आपल्या देशात काय कामाचं? कोरोनावर नियंत्रण मिळवणं राज्यांची जबाबदारी आहे असंही या मंत्री महोदयांचं म्हणणं आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवणं जर राज्यांची जबाबदारी आहे तर मग केंद्राची काय जबाबदारी आहे? केवळ राज्यांमध्ये निवडणुका लावणं आणि गल्लोगल्ली प्रचार करत हिंडणं एवढंच काम आहे का केंद्र सरकारचं? असा प्रश्न रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला आहे.
रूपाली चाकणकर यांनी कोरोनाच्या प्रतिकारासाठी भाजप नेत्यांनी आधी केलेल्या दाव्यांची खिल्ली देखील उडविली. केंद्रीय आरोग्यमंत्री रामदेव बाबांचे सेल्समन बनून पतंजलीच नकली औषध विकण्यात व्यस्त होते. केंद्रीय उद्योगमंत्री अर्जुन मेघवाल हे कोरोनाला घालवण्यासाठी भाभीजी पापड खा असा बिनडोक सल्ला देत होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही कोरोनाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं सांगत होत्या. त्यामुळे केंद्र सरकार आणि केंद्रातले वाचाळ मंत्री काय योग्यतेचे आहेत हे वेगळं सांगायला नको. अशा निष्क्रिय केंद्र सरकारचं लवकरच अरबी समुद्रात विसर्जन केलं पाहिजे. आमचा लढा आम्ही लढू. इंजेक्शन, लस , व्हेंटिलेटर्स अशा संसाधनांवर असलेल केंद्र सरकारचं नियंत्रण ताबडतोब रद्द करा, केंद्राकडे गेल्या कित्येक महिन्यापासून असलेली महाराष्ट्राची उधारी ताबडतोब चुकती करा. आमचा महाराष्ट्र हे आव्हान पेलायला समर्थ आहे. आमच्या मराठी भाषेत एक म्हण आहे भीक नको पण कुत्रं आवर याच पार्श्वभूमीवर मदत नको, पण तुमच्या वाचाळ मंत्र्यांना आवरा अशी पंतप्रधानांना विनंती आहे असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.