चांगदेवला तापी-पूर्णा संगमातीरी अस्थी विसर्जनास बंदी : आढळल्यास दंडात्मक कारवाई

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तिर्थक्षेत्र चांगदेवला तापी-पूर्णा संगमातीरी अस्थी विसर्जनास ग्रामपंचायत प्रशासनाने बंदीजाहीर केली असून अस्थी विसर्जन करतांना कोणी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

चांगदेव तिर्थक्षेत्र  हे तापी-पूर्णा संगमातीरी असून महाराष्ट्रात पुरातन तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. तापी-पूर्णा नद्यांचा संगम असल्याने याठिकाणी बाराही महिने धार्मिक विधी, धार्मिक कार्यक्रम, नदी परिक्रमा, संगमदर्शन त्याचप्रमाणे अस्थी विसर्जन, दशपिंडी विधी, त्रिपिंडी, नारायण नागबली, कालसर्प विधी असे अनेकविध धार्मिक विधी येथे होत असतात. 

परंतु,  दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना संसर्गामुळे येथिल स्थानिक प्रशासनाने कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी येथे होणाऱ्या अस्थी विसर्जनास सक्त मनाई केलेली आहे. तरी जिल्हातील अथवा बाहेरील जिल्हातील कुणीही अस्थी विसर्जनास तिर्थक्षेत्र चांगदेव येथे तापी-पूर्णा संगमातीरी अस्थी विसर्जनास आणू नये. आणल्यास स्थानिक प्रशासनातर्फे दंडात्मक कार्यवाही केली जाईल. तसेच संगमातीरी असलेले संत चांगदेव महाराज व महानुभाव पंथीय श्रीकृष्ण मंदिर हे बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे अस्थी विसर्जन विधीस कोणालाही कुठल्याही प्रकारची मदत या तिर्थस्थळी केली जाणार नाही यांची नोंद सर्व जिल्हातील अथवा बाहेरील जिल्हातील जनतेने घ्यावी असे आवाहन चांगदेव ग्रामपंचायत सरपंच निखिल बोदडे , पोलिस पाटील पल्लवी चौधरी आणि ग्रामविस्तार अधिकारी आर.  एस. चौधरी यांनी केली आहे.

 

Protected Content