चाळीसगाव प्रतिनिधी । येथील नॅशनल टोबॅको या दुकानाचे शटर तोडून १८ लाख रुपयांच्या सिगारेट चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सुरेश साबलदार रावलानी यांचे पवन कॉम्प्लेक्समध्ये नॅशनल टोबॅको या नावाने दुकान आहे. त्यांच्याकडे आयटीसी लिमिटेड या कंपनीची डिलरशिप आहे. रावलानी हे शुक्रवारी रात्री ८ वाजता दुकान बंद करून घरी गेले. तर शनिवारी, रविवारी दोन दिवस विकेंड लॉकडाऊन असल्याने ते दोन दिवस दुकानाकडे आलेच नाहीत. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकानात आले असता त्यांना दुकानाच्या शटरला लॉक करण्यासाठी असलेल्या पट्ट्या तुटलेल्या दिसल्या. तर शटर समोरील सीसीटीव्ही कॅमेरा ही जागेवर नव्हता. रावलानी यांनी ही माहिती तत्काळ पोलिसांना दिली.
यानंतर त्यांनी शटर उघडून पाहणी केली असता चोरट्यांनी विविध प्रकारच्या सिगारेटची पाकिटे व अन्य साहित्य असा १८ लाख ३९ हजार ३१७ रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन वर्षापूर्वी ही याच दुकानातून अशाच प्रकारे चोरी करुन सुमारे १२ लाखांच्या सिगारेट चोरीस गेल्या होत्या.