चाळीसगाव, प्रतिनिधी | स्कुटरवरून घरी जात असताना एका चारचाकी वाहनधारकाने कट मारून शिवीगाळ करत घरी जाऊन बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील ग्रामसेवक कॉलनी येथे घडली होती. यात जखमीच्या जाबजबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, चंद्रशेखर मुरलीधर गायकवाड (वय- ४६ रा. ग्रामसेवक कॉलनी, धुळे रोड ता. चाळीसगाव) हे आई अंजना गायकवाड, पत्नी भावना गायकवाड व मुलगा मल्हार गायकवाड यांच्यासह वास्तव्यास आहेत. चंद्रशेखर गायकवाड हे आपल्या एॅक्टीव्हा स्कुटरवरून घरी जात होते. मात्र शहरातील रेल्वे पुलाजवळील धुळे रोड येथे एका लाल रंगाच्या चारचाकीने कट मारला असता त्यात बसलेले जाधव (रा. ग्रामसेवक कॉलनी, धुळे रोड), मनोज पवार व गणेश पवार दोघेही रा. पोस्टल कॉलनी ता. चाळीसगाव आदींनी शिवीगाळ केली. मात्र चंद्रशेखर गायकवाड हे शिवीगाळ करू नका असे बोलून घरी जाण्यासाठी निघून गेले. दरम्यान चंद्रशेखर गायकवाड, पत्नी भावना गायकवाड व शेजारील गणेश देशमुख हे रात्री ९:४५ वाजताच्या सुमारास अपार्टमेंटच्या खाली पार्किंगमध्ये बसलेले असताना जाधव, गणेश पवार, मनोज पवार व दोन अनोळखी इसम त्याठिकाणी आल्या आल्या जाधव यांनी त्यांचे हातातील लोखंडी रॉडने चंद्रशेखर गायकवाड यांच्या डोक्यात तर मनोज पवार याने धारदार शस्त्राने दोन्ही हातांवर वार करून गंभीर दुखापत केली. तसेच गणेश पवार यांनी लोखंडी रॉडने तोंडावर मारून जखमी केले. हि घटना दि. ८ एप्रिल रोजी रात्री ९:१५ वाजताच्या सुमारास घडली होती. तेव्हा पत्नी भावना गायकवाड व गणेश देशमुख यांनी त्यांच्या तावडीतून सुटका करून उपचारासाठी परदेशी एॅक्सीडेंट हॉस्पिटलात त्याच रात्री दाखल केले. उपचार सुरू असताना दि. १० एप्रिल रोजी रात्री ९: ३४ वाजताच्या सुमारास चंद्रशेखर गायकवाड याच्या जाबजबाबावरून शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि सचिन कापडणीस हे करीत आहेत.