जळगाव प्रतिनिधी । शहरातील दाणाबाजार परिसरात माल घेण्यासाठी आलेल्या दोन व्यापाऱ्यांची पैशाने भरलेली बॅग अज्ञात चोरट्याने लांबून नेल्याची घटना बुधवार ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. बॅग लांबविणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून याप्रकरणी १ लाख ६१ हजारांची रोकड लांबवल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडावद येथील किराणा दुकान व्यावसायिक उमेश रमेश कासट (वय- ४२) हे किराणा माल घेण्यासाठी दाणा बाजारातील लिकासन ट्रेडर्स येथे बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता आले होते. त्यावेळी त्यांच्या हातामध्ये कापडी पिशवी होती. त्या पिशवीमध्ये किराणा माल भरण्यासाठी लागणारी उधारीची चोपडी व दिड लाख रुपये रोख होते. ते दुकानात चढले व घाईगडबडीत हातातील कापडी बॅग लिकासन ट्रेडर्स दुकानाचे बाहेरील टेबलावर ठेवली. अंग खाजवत असल्याने ते अंगातील टि-शर्ट काढण्यासाठी दुकानात जाऊन टी-शर्ट काढून अंग खाजवून परत दुकानाचे बाहेर आले असता त्यांना टेबलावर ठेवलेली कापडी पिशवी दिसली नाही. त्यांनी बाहेर येऊन बघीतले असता काळ्या रंगाचे टिपके असलेला मळकट रंगाचा फुल बाहीचा शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, काळ्या रंगाचा मास्क घातलेला, सडपातळ शरीरयष्ठी असलेला एक अनोळखी इसम कापडी पिशवी घेऊन पळतांना दिसला व तो पळून गेला. त्यांनी लागलीच दुकानाचे बाहेर खाली उतरून इतरांना घडलेला प्रकार सांगितला. हा सर्व प्रकार दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
कासट बाजारात तपास करीत असताना सुगोकी दुकानाचे समोर रोडवर रामनगरातील रहिवासी शेख नियाजोद्दीन शेख रियासोद्दीन वय- ३६ यांनी मोटार सायकलला लावलेली काळी रंगाची बॅग त्यामध्ये एक लावा कंपनीचा मोबाईल आणि ११ हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग देखील चोरट्याने लंपास केल्याचे समोर आले. शहर पोलिसात उमेश कासट यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय निकुंभ करीत आहे.