पुणे : वृत्तसंस्था । येत्या 48 तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी तापमान वाढलेले दिसून येत आहे,
राज्याच्या अनेक भागात सध्या तापमान चाळीस अंशापर्यंत पोहोचले आहे, गेल्या काही दिवसात कोकण आणि गोव्यात तापमानात मोठी वाढ दिसून आली होती, मात्र समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यामुळे वातावरणातली उष्णता कमी झाली, अशी माहिती पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ अनुराग कश्यपी यांनी दिली.
कोकण गोव्यासह विदर्भ, मराठवाडा ,मध्य महाराष्ट्र या भागात तापमानात वाढ झालेली दिसून येत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. येत्या 72 तासांमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी तापमान हे 40 अंश सेल्सियस आणि त्यापेक्षा जास्त नोंद होण्याची शक्यता असल्याने या भागात उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भ वगळता इतर भागात मात्र उष्णतेची लाट नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे, मात्र सरासरी तापमान हे राज्याच्या अनेक भागात ज्यास्तच असल्याचे सांगण्यात आले आहे.
विदर्भात सध्या तापमान वाढलेले असून सामान्य पेक्षा 3 ते 5 अंशाने तापमान वाढलेले आहे, त्याच बरोबर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या भागातही तापमान 2 ते 3 अंशाने वाढलेले आहे..कोकण गोव्यात किनार पट्टीच्या भागात मागच्या काही दिवसात उष्णतेची लाट येऊन गेली. मात्र, सध्या तिथे परिस्थिती सामान्य असल्याचे हवामान विभागाचे शास्रज्ञ अनुराग कश्यपी यांनी सांगितले आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात हवामान कसे राहील याबाबत देखील हवामान विभागाने माहिती दिली असून एप्रिलच्या मध्या पर्यत कोकण गोवामध्ये तापमान काही प्रमाणात जास्त राहील. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहील तसेच कोकण गोवा भागात देखील या काळात तापमान वाढलेले राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात पारा 41 अंश से. इतकावर गेला आहे तर मंगळवारीही तापमान 41 अंशावर होते, तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.विदर्भात अचानक तापमान वाढण्यामागे राजस्थानकडून येणारे उष्ण वारे कारणीभूत असल्याची माहिती असून पुढील काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार आहे.
परभणीत मागील चार दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आज परभणीचे तापमान 39.7 अंशांवर पोहोचले आहे.तापमानात अचानक वाढ झाल्याने नागरिकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय करावे लागत आहेत.
चंद्रपूरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसह सुर्य कोपण्यास सुरुवात झाली असून राज्यात कालचे सर्वाधिक तापमान चंद्रपुरात 43.6 डिग्री सेल्सियस इतके नोंदवले गेले.